ऑटोस्विच ठरताहेत रोहित्रांसाठी कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 04:25 PM2020-10-18T16:25:35+5:302020-10-18T16:31:07+5:30
MSEDCL, Agriculture Pumps सर्व कृषी पंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो.
अकोला : ऑक्टोंबर हिट व रबी हंगामाला सुरूवात झाल्याने कृषी पंपाच्या वीज वापरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने ग्राहकांनी कृषिपंपाना ऑटोस्विच बसविले आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व कृषी पंप एकाच वेळी सुरू होऊन रोहित्रावरील भार अचानक वाढतो. परिणामी रोहित्र जळणे, वीजवाहिन्या बंद वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते. ऐन हंगामात रोहित्र नादुरूस्त झाल्याची झळ शेतकऱ्यांनाही बसते आणि महावितरणलाही बसते.त्यामुळे यातून होणारी गैरसोय व नुकसान टळावे तसेच सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्याअकोला परिमंडलाच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रत्येक कृषिपंपास क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसविणे हा रोहित्र जळणे वा नादुरुस्त होण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी एक सोपा उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद तर काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत.
कृषी क्षेत्रातील कार्यक्षम ऊर्जा वापरात कॅपॅसिटर हे उपकरण महत्त्वाचे आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. योग्य विद्युतदाब, केव्हीए मागणी, वीज वापरात बचत आदी फायदे होतात. पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळतो, कृषिपंप जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच रोहित्रांवरील भार ३० टक्क्यांने कमी होऊन रोहित्र नादुरुस्तीचे व जळण्याचेही प्रमाणही कमी होते. यामुळे शेतकर्यांना योग्य दाबाचा, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळेल. या सर्वांचा लाभ शेतकर्यांना होणार असल्यामुळे त्यांनी '' कॅपॅसिटर''चा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे.
ऑटोस्विचचा वापर टाळावा
अकोला परिमंडळात (अकोला,बुलढाणा व वाशिम) जिल्ह्यात सुमारे २.८० लाख कृषी पंपधारक शेतकरी आहेत.महावितरणकडून या शेतकर्यांना दिवसा व रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो. हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषिपंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकर्यांनी कृषिपंपांना ''ऑटोस्विच'' लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढत असल्याने रोहित्र जळण्याचे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास त्याची झळ शेतकर्यांनाही सोसावी लागते. हे टाळण्यासाठी शेतकर्यांनी कृषिपंपांना ''ऑटोस्विच'' लावू नये तसेच इतर शेतकर्यांनी ते लावले असल्यास ते काढून टाकावे असे आवाहनही महावितरण अकोला परिमंडळाकडून करण्यात येत आहे.