राज्यात आता २३१ तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी!
By admin | Published: August 6, 2016 01:46 AM2016-08-06T01:46:34+5:302016-08-06T01:46:34+5:30
ऑगस्ट महिन्यातही पाऊस, पण दोन तालुक्यात २५ ते ५0 टक्केच पाऊस.
अकोला, दि. ५: यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात सरासरीच्या १0९ टक्के पाऊस झाला आहे. ३५५ तालुक्यापैकी २३१ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. १३९.६४ लाख हेक्टरपैकी १३५.0२ लाख हेक्टर म्हणजेच ९७ टक्के पेरण्या आटोपल्या असून, पीकपरिस्थिती सर्वत्र उत्तम आहे; परंतु दोन तालुक्यात २५ ते ५0 तर २६ तालुक्यात केवळ ५0 ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.
यावर्षी दमदार सार्वत्रिक पावसामुळे सर्वत्र पिके बहरली आहेत. भात व नाचणी पिकाच्या पुनर्लागवडीची कामे प्रगतिपथावर आहेत. राज्यातील सर्वच विभागात पेरण्या प्रगतिपथावर आहेत. ऑगस्टच्या प्रथम आठवड्यात कोकणात ४७ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात ७५ ते १00 टक्के, तर ३८ तालुक्यात १00 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला असून, खरिपातील ४.८७ हेक्टरपैकी ३.६९ लाख हेक्टर म्हणजेच ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी व लागवड झाली आहे.
नाशिक विभागातील ४0 तालुक्यांपैकी एका तालुक्यात २५ ते ५0 टक्के, ८ तालुक्यात ५0 ते ७५ टक्के, १८ तालुक्यात ७५ ते १00 टक्के तर १३ तालुक्यात १00 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या विभागात खरिपाच्या २१.५१ लाख हेक्टरपैकी १९.८६ लाख हेक्टर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली. पुणे विभागात ३९ तालुक्यापैकी २३ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागात खरिपाचे ७.३९ हेक्टर क्षेत्र आहे; पण यावर्षी ९.३६ लाख हेक्टर म्हणजेच १२७ टक्के पेरणी झाली. कोल्हापूर विभागातील ३३ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला. या विभागात खरिपाचे ८.0६ लाख हेक्टर क्षेत्र आहे; पण ८.२९ लाख हेक्टर म्हणजेच १0३ टक्के पेरणी झाली आहे.
औरंगाबाद विभागातील २८ तालुक्यांपैकी १९ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. या विभागात खरिपाचे १८.८७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. तथापि, यावर्षी २0.६९ लाख म्हणजेच ११0 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर विभागातील ४८ तालुक्यापैकी ३८ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला असून, खरिपाच्या २७.२७ लाख हेक्टरपैकी २६.३९ हेक्टर म्हणजेच ९७ टक्के पेरणी झाली आहे.
अमरावती विभागातील ५६ तालुक्यापैकी ४७ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला असून, ३२.६८ लाख हेक्टरपैकी ३१.९९ लाख हेक्टर म्हणजेच ९८ टक्के पेरणी आटोपली आहे. नागपूर विभागातील ६४ तालुक्यापैकी ३१ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. खरिपाच्या १८.९८ लाख हेक्टरपैकी १४.७४ लाख म्हणजेच ७८ टक्के पेरणी झाली आहे.
"अमरावती विभागात पावसाने जुलै महिन्यातच सरासरी ओलांडली आहे. पिके उत्तम आहेत. शेतकर्यांना आता मशागतीसाठी काही दिवस उघडीप हवी आहे."
- एस.आर. सरदार,
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.