महिन्याभरात सरासरी २०० युनिटनी घटले रक्त संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 06:45 PM2019-03-22T18:45:35+5:302019-03-22T18:45:44+5:30
अकोला : उन्हाची वाढती तीव्रता अन् सुट्ट्यांमूळे महाविद्यालयीन रक्तदान शिबिरांना ब्रेक लागल्याने रक्त संकलनाची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी गत महिनाभरात सरासरी २०० युनिटनी रक्तसंकलन घटले आहे.
अकोला : उन्हाची वाढती तीव्रता अन् सुट्ट्यांमूळे महाविद्यालयीन रक्तदान शिबिरांना ब्रेक लागल्याने रक्त संकलनाची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी गत महिनाभरात सरासरी २०० युनिटनी रक्तसंकलन घटले आहे. उन्हाची तिव्रता आणखी वाढणार असल्याने एप्रिल व मे महिन्यात रक्त संकलनाचे प्रमाण आणखी घटण्याची शक्यता आहे.
साधारणत: एका रक्तपेढीमध्ये महिन्याला एक हजार युनिट रक्त संकलीत केले जाते. शहरात शासकीय व खासगी अशा एकूण पाच ते सहा रक्तपेढ्या आहेत. त्यामुळे रुग्णांना रक्ताची चणचण भासत नाही. परंतु, उन्हाळा लागला की रुग्णांना ऐन वेळी रक्त मिळत नाही. कारण, उन्हाळ््यात रक्तदात्यांची संख्या झपाट्याने कमी होत जाते.शिवाय, महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरांनाही ब्रेक लाकतो. मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, त्याचा परिणाम रक्तसंकलनावरही दिसून येत आहे. शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त संकलनाचे प्रमाण कमी होत असून, महिनाभरातच सरासरी २०० युनिटनी रक्त संकलन कमी झाले आहे. हे प्रमाण एप्रिल व मे महिन्यात आणखी घटणार असून, केवळ ५०० ते ६०० युनिट संकलित होण्याची शक्यता आहे.
व्हॉट्स अॅप ग्रुपची महत्त्वाची भूमिका
उन्हाळ््यात रक्त संकलनाचे प्रमाण घटल्याने ऐन वेळी रुग्णाला रक्त मिळत नाही. अशा परिस्थितीत व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून जुळलेल्या रक्तदात्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची उपलब्धता नसली, तरी अशा रक्तदात्यांच्या माध्यमातून रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यास मदत होईल.
रक्ताचा बाजार होण्याची शक्यता
मर्यादीत रक्त संकलनामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रक्तासाठी फिरावे लागते. परंतु, ऐन वेळेवर रक्त न मिळाल्याचे पाहून या काळात रक्ताचे दलाल सक्रिय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यापूर्वी सर्वोपचार परिसरात रक्त मिळवून देतो म्हणून रक्ताचा बाजार करणाऱ्यांचे पितळ उघडे झालेले आहे. हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनासोबतच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.
उन्हाळ््यामुळे बहुतांश लोक रक्तदान करण्यास टाळाटाळ करतात. शिवाय या काळात महाविद्यालयांमध्ये होणारे रक्तदान शिबिर बंद झाल्याने रक्त संकलनात कमी येते. परंतु, रक्तदात्यांनी रक्तदानास पुढाकार घ्यावा.
- डॉ. बाळकृष्ण नामधारी, विभाग प्रमुख, शासकीय रक्तपेढी, जीएमसी, अकोला