तारीख देऊनही दिव्यांगांच्या तपासणीस टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:45 PM2019-07-14T14:45:38+5:302019-07-14T14:45:45+5:30
काही दिव्यांगांना तपासणीसाठी बोलाविण्यात येऊनही त्यांची तपासणी होत नसल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येत नसल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आहे; मात्र काही दिव्यांगांना तपासणीसाठी बोलाविण्यात येऊनही त्यांची तपासणी होत नसल्याची माहिती समोर आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांगांच्या सुविधेसाठी दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे; परंतु येथे दिव्यांगांना सुविधा कमी आणि त्रास जास्त होत असल्याचे निदर्शनात येत आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज करूनही त्यांना तपासणीसाठी बोलाविण्यात येत नाही. काहींना बोलाविल्या जात असले, तरी दिव्यांग कक्षात त्यांची तपासणी करण्यास टाळाटाळ होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. यासंदर्भात काही दिव्यांगांना अधिष्ठाता तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत; मात्र त्यानंतरही दिव्यांग कक्षातील या अजब कारभाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
दिव्यांग योजनांपासून वंचित
प्रमाणपत्र न मिळाल्याने जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. आॅनलाइन प्रणालीमुळे त्रास कमी होणार, अशी अपेक्षा दिव्यांगांना होती; मात्र योग्य नियोजन नसल्याने दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घ्यावे लागत आहेत.