सभापतींना ‘हाइजिन किट’ची माहिती देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:35 AM2020-12-12T04:35:17+5:302020-12-12T04:35:17+5:30
महापालिकेतील महिला व बाल कल्याण विभागामार्फत मनपा शाळेतील विद्यार्थी तसेच शहरातील सुशिक्षीत, बेराेजगार युवती, महिलांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. ...
महापालिकेतील महिला व बाल कल्याण विभागामार्फत मनपा शाळेतील विद्यार्थी तसेच शहरातील सुशिक्षीत, बेराेजगार युवती, महिलांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. जुलै २०१९ मध्ये या समितीच्या सभापतीपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या मनीषा भंसाली यांनी मागील पाच वर्षांपासून थंड बस्त्यात सापडलेल्या याेजना निकाली काढण्यासाठी प्रशासनाला वारंवार निर्देश दिल्याचे दिसून आले; परंतु शिक्षण विभाग असाे वा महिला व बाल कल्याण विभागाने सभापतींच्या प्रयत्नांना खीळ घातल्याचे चित्र आहे. महिला व बाल कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना याेजना अमलात आणण्यासाठी माहिती सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतरही या विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची माहिती आहे. हीच कार्यपध्दती शिक्षण विभागाची असून सभापती भंसाली यांनी मनपा विद्यार्थिनींना उपलब्ध करून देण्यात आलेल्या १,३९० हाइजिन किटची माहिती मागितली असता, शिक्षण विभागाकडून चालढकल केली जात असल्याचे समाेर आले आहे.
उपायुक्तांनी निर्देश दिल्यावरही...
शिक्षण विभागाकडून विद्यार्थिनींना हाइजिन किट देण्यात आली नसल्याचे समाेर आल्यानंतर सभापती मनीषा भंसाली यांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले. आयुक्तांनी सदर पत्राची दखल घेत माहिती देण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांना दिले. त्यानंतर उपायुक्त पूनम कळंबे यांनीही शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती देण्याची सूचना केली. तरीही सभापती भंसाली यांना किटसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली नाही, हे येथे उल्लखेनीय.
चिमुकले विद्यार्थी, हाेतकरू महिलांना याेजनांचा लाभ मिळावा, यासाठी सत्तापक्ष आग्रही आहे. शिक्षण विभाग व महिला बाल कल्याण विभागात कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भरणा असल्यामुळे लाभार्थी याेजनांपासून वंचित आहेत.
-मनीषा भंसाली सभापती, महिला व बाल कल्याण समिती