जलयुक्तची कामे करण्यास टाळाटाळ
By admin | Published: May 22, 2017 01:06 AM2017-05-22T01:06:33+5:302017-05-22T01:06:33+5:30
बोरगाव खुर्द येथील मंजूर आराखड्यातील कामे ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जलयुक्त शिवार योजनेत गेल्या वर्षी समाविष्ट आणि कामांचा आराखडा तयार असताना त्यातील कामे करण्यास जलसंधारणसह विविध विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे, अशी तक्रार बोरगाव खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य, माजी सरपंच श्यामकुमार हेडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जलयुक्त शिवार योजनेसाठी गावाची निवड २०१६-१७ या वर्षात झालेली आहे. त्यावेळी गावात करावयाच्या कामांच्या मंजूर आराखड्यानुसार लघुसिंचन विभाग (जलसंधारण) मार्फत नाला खोलीकरण, सरळीकरण, साखळी सिमेंट नाला बांध, नदी खोलीकरण, कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे आहेत. त्यापैकी कोणतेच काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. ग्रामपंचायतने सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला; मात्र भूजल सर्वेक्षण यंत्रणा परवानगी देत नाही. कामासाठी स्ट्रक्चर नाही, अशी कारणे सांगत टाळाटाळ केली जात आहे. चालू वर्षात गावात भीषण पाणीटंचाई आहे. त्यासाठी आधीच कामे झाली असती तर हे संकट ओढवले नसते. तरीही प्रशासनातील अधिकारी-पदाधिकाऱ्यांना त्याचे काहीच वाटत नसल्याचेही हेडा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
कामे होत नसल्यामुळे शेतीचे, पिकांचे, विद्यार्थ्यांचे विविध प्रकारे नुकसान होत आहे. त्यातून शेतकरी आत्महत्या झाल्यास त्याची जबाबदारी कामांची टाळाटाळ करणाऱ्यांवर निश्चित करावी, अशी मागणीही हेडा यांनी तक्रारीत केली आहे.