वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:54+5:302021-02-16T04:19:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेट्री : पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्रांतर्गत खेट्री शिवारात लाखो रूपयांची वीजचोरी होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेट्री : पातूर तालुक्यातील सस्ती वीज उपकेंद्रांतर्गत खेट्री शिवारात लाखो रूपयांची वीजचोरी होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने ५ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केल्यावर वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश उपअभियंत्यांनी सस्ती उपकेंद्राच्या कनिष्ठ अभियंत्याना दिले होते. परंतु, आदेश देऊन आठवडा उलटून गेला तरीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.
खेट्री शिवारात लाखो रूपयांची वीजचोरी होत असल्याबाबतची तक्रार सस्ती वीज उपकेंद्राच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे करण्यात आली. परंतु, वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. कनिष्ठ अभियंता व वीजचोरी करणाऱ्याची मिलीभगत असल्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप कोटेशन भरून वीज जोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांकडून होत आहे. दर महिन्याला ५०० रुपये द्या आणि २४ तास वीज वापरा, असा सल्ला महावितरणकडून वीज चोरांना दिला जात आहे. त्यामुळे रात्रं-दिवस सर्रास लाखोंची वीज चोरी होत आहे. कनिष्ठ अभियंत्याना वरिष्ठांचे पाठबळ असल्याचाही आरोप होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने ५ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करताच, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजचोराविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश कनिष्ठ अभियंत्याना दिले होते. परंतु, यावर आठवडा उलटूनही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे.
वीजचोरी करणाऱ्यांना महावितरणकडून पाठबळ!
सस्ती वीज उपकेंद्रांतर्गत खेट्री शिवारात सर्रास २४ तास लाखो रूपयांची वीजचोरी होत आहे. परंतु, संबंधित महावितरण विभाग व वीजचोरी करणारे यांची मिलीभगत असल्याने वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येत नसल्याने महावितरणचे वीजचोरी करणाऱ्यांना पाठबळ असल्याचेच दिसून येत आहे. लाखोंची वीजचोरी होत असतानाही महावितरणकडून कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न या परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.