शेळीपालन शेडचे आठ महिन्यांपासून देयक काढण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:23 AM2021-09-06T04:23:06+5:302021-09-06T04:23:06+5:30
नासीर शेख खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी येथील एका पशुपालकाचे गेल्या आठ महिन्यांपासून शेळीपालन शेडचे देयक काढण्यास टाळाटाळ केली ...
नासीर शेख
खेट्री : पातूर तालुक्यातील सुकळी येथील एका पशुपालकाचे गेल्या आठ महिन्यांपासून शेळीपालन शेडचे देयक काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अनुदानासाठी पशुपालकाने वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुकळी येथील पशुपालक सुरेश किसन भिसे यांनी ३५ हजार रुपयांच्या अनुदानावर शेळीपालन शेडसाठी पंचायत समितीमध्ये अर्ज केला होता. १९ ऑक्टोबर २०२० रोजी शेळीपालन शेड बांधण्यास मंजुरी मिळाली. बांधकाम केल्यानंतर देयक लवकरच मिळतील, या आशेवर सुरेश भिसे यांनी व्याजाने पैसे घेऊन शेळीपालन शेडचे बांधकाम १० जानेवारी २०२१ रोजी पर्यंत पूर्ण केले; परंतु संबंधित असलेल्या काही जणांनी पैशाची मागणी केली, पैशाची मागणी पूर्ण न केल्याने गेल्या आठ महिन्यांपासून देयक काढण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार सुरू आहे. आठ महिन्यांपासून पशुपालकांचे हेलपाटे सुरू आहे. याबाबतची तक्रार पशुपालक सुरेश भिसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली; परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने पशुपालक संकटात सापडला आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
--------------
शेळीपालन शेडचे देयक काढण्यासाठी पैशाची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न केल्याने हेतूपुरस्पर देयक थांबविण्यात आले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली; परंतु अद्यापही दखल घेतली गेली नाही. - सुरेश किसन भिसे, पशुपालक सुकळी
------------
देयक काढण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. शेळीपालन शेड बांधकाम केल्यावर जीएसटीचे बिल सादर केल्यावर लवकरच देयक काढले जातात. - अमोल कठोळे, लिपिक, पं. स., पातूर