ओवेसींच्या भूमिकेच्या प्रतीक्षेत; इच्छुकांचा जीव टांगणीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:42 PM2019-09-09T12:42:11+5:302019-09-09T12:42:47+5:30
आघाडीच्या भरवशावर उमेदवारी लढविण्याची स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
- राजेश शेगोकार
अकोला : लोकसभा निवडणुकीत दलित, बहुजन व मुस्लीम मतांची मोट बांधण्यासाठी एकत्र येत वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली होती. यामधून ‘एमआयएम’ने आता बाजूला होत असल्याची घोषणा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तीयाज जलील यांनी केली. या घोषाणेनंतर ‘वंचित’ला ‘एमआयएम’चे अध्यक्ष असुदोद्दीन ओवेसींच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे. ओवेसींनी इम्तीयाज यांची भूमिका कायम ठेवल्यास राज्यातील ४५ विधानसभा मतदारसंघांत समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने या आघाडीच्या भरवशावर उमेदवारी लढविण्याची स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ‘एमआयएम’ला सोबत घेत नवा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न अॅड. प्रकाश आंबेडकर व असुदोद्दीन ओवेसी यांनी केला. या प्रयोगामुळे राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघांत समीकरणे बदलली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, स्वाभिमानीचे राजू शेट्टी अशा अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित-एमआयएम आघाडी राज्यातील किमान ४५ जागांवर विजयाच्या शर्यतीत राहील, असा सूर राजकीय वर्तुळात उमटत होता. या पृष्ठभूमीवर या आघाडीकडून लढण्यासाठी अनेक इच्छुकांनी ‘लॉबिंग’ सुरू केली होती. राज्यातील मालेगाव मध्य, अकोला पश्चिम, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, परभणी, नांदेड, कळमनुरी, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, सिल्लोड अशा अनेक मतदारसंघांत मुस्लीम मतदान प्रभावी आहे. या मतांना ‘वंचित’च्या मतांची जोड मिळाल्यास विजयी होण्याची आशा अनेकांनी बाळगली होती. या सर्व इच्छुकांचा जीव आता टांगणीला लागला आहे. ‘वंचित’च्या फुटीवर ओवेसींनी शिक्कामोर्तब केले, तर इच्छुकांना नव्याने मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.
काँग्रेसच्या उमेदवारीपासून ‘वंचित’ राहणारे सावध!
काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीकडून उमेदवारीसाठी वंचित राहावे लागले तर वंचित बहुजन आघाडीकडून लढण्याच्या तयारीत असलेल्या अनेक नेत्यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. काँग्रेस, राष्टÑवादीच्या जागा वाटपात मतदारसंघ कुणाला सुटतो, कोण उमेदवार ठरतो, यानंतरच ‘वंचित’चा मार्ग धरायचा की पक्षादेश मान्य करून काम करायचे, या संभ्रमात इच्छुक सावध झाले आहेत.
इम्तीयाज यांनी केलेल्या घोषणेनंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका प्रवक्ते या नात्याने जाहीर केलेली आहे. त्यामुळे या आघाडीबाबत आम्हाला ओवेसींची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यावरच आम्ही पुढील रणनीती जाहीर करू.
-डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी.