अकोला जिल्हा परिषदेला ‘राष्ट्रीय दिव्यांगजन ’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
By संतोष येलकर | Published: December 3, 2022 07:11 PM2022-12-03T19:11:25+5:302022-12-03T19:12:20+5:30
दिव्यांगांचे सर्वेक्षण अन् सक्षमीकरणात सर्वोत्तम कामगिरीचा पटकावला मान; ‘सीइओं’नी स्वीकरला पुरस्कार
अकोला: जिल्ह्यातील दिव्यांगांचे सर्वेक्षण आणि दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत देशात सर्वोत्तम कामगिरीचा मान पटकविणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला शनिवार, ३ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन ’ पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी (सीइओ) अधिकारी सौरभ कटीयार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्यावतीने २०२१ आणि २०२२ या वर्षांतील ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि प्रतिमा भौमिक उपस्थित होते.
अपंगत्वावर मात करत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या देशातील दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, राज्य आणि जिल्हयांना या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये दिव्यांगांचे सर्वेक्षण करुन दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजवाणीत उल्लेखनीय योगदानाच्या श्रेणीत देशात सर्वेात्तम कामगिरीचा मान पटकावणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते अकोला जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे स्वरुप असलेला हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कर्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी स्वीकारला.
दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळणे झाले सुकर
अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग आणि समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले असून, या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांसाठी असलेल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना सुकर झाले आहे.