Ayodhya Verdict : सन्मान, संयम, शांतता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:11 PM2019-11-10T12:11:10+5:302019-11-10T12:11:36+5:30
सामाजिक सलोखा अन् सौहार्द कायम ठेवत दिवसभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा समाज माध्यामांवरही टीका-टिपणी उमटली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला जिल्ह्यात अयोध्या निकालाचा सन्मान ठेवत नागरिकांनी अभूतपूर्व संयम दाखवित शांतता कायम ठेवली. सामाजिक सलोखा अन् सौहार्द कायम ठेवत दिवसभरात कुठेही प्रत्यक्ष किंवा समाज माध्यामांवरही टीका-टिपणी उमटली नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शनिवारी बहुचर्चित अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर केला. निकालानंतर जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. अकोला शहरासह, जिल्हाभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, यासोबतच पोलीस, राजकीय पुढारी तसेच सामाजिक संघटनांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर जिल्ह्यात शांततेचे वातावरण आहे. जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आली असून, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी शहरातील पोलीस ठाण्यांसह ग्रामीण भागातील पोलीस ठाणे तसेच संवेदनशील ठिकाणांवर भेटी देऊन तपासणी केली. जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच ठाणेदार, पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
कडेकोट बंदोबस्त तैनात
जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात एसआरपीएफ प्लाटून, ५ आरपीसी प्लाटून, १ क्यूआरटी प्लाटून, १ हजारावर होमगार्ड, ३१ स्ट्रायकिंग फोर्स, एलसीबी, डीएसबी यांच्यासह पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कुठल्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त
जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, अकोट, मूर्तिजापूर या ठिकाणी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शांतता समितीची घेतली बैठक
शहरात कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षकांनी शनिवारी शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी काही सदस्यांनी सोशल मीडियावर तसेच समाजकंटकांवर लक्ष ठेवावे तसेच कोणीही फटाके फोडणार नाही, याबाबत दक्षता घेतली जावी, असे सांगितले.
शाळा-महाविद्यालयांना सुटी नाही
राज्यातील अनेक जिल्ह्यासह बुलडाणा व वाशिममध्येही शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे; मात्र सलोख्याच्या वातावरणात या निर्णयाचा सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक असून, कुणालाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेणार असल्याचे नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सांगितल्यानंतर त्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली नाही.