आयुर्वेद निवासी डॉक्टरांना मिळणार मानधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:34 PM2020-06-05T17:34:32+5:302020-06-05T17:34:54+5:30
सलग दोन महिने निशुल्क रुग्णसेवा देणाऱ्या आयुर्वेद निवासी डॉक्टरांना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अकोला : शहरात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत असताना एकट्या जीएमसीवर रुग्णसेवेचा ताण वाढला होता. अशातच पातूर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय तसेच अकोल्यातील रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टर जीएमसीच्या मदतीला धावून आलेत. सलग दोन महिने निशुल्क रुग्णसेवा देणाऱ्या आयुर्वेद निवासी डॉक्टरांना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना येथील आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी निशुल्क रुग्णसेवा देण्यास सुरुवात केली. वेतनावर असलेल्या डॉक्टरांनी रुग्णांची स्वॅब घेण्यास माघार घेतल्यानंतर या निवासी डॉक्टरांनी जीवाची परवा न करता कोरोना संदिग्ध रुग्णांचे नमुने संकलित करण्यास सुरुवात केली. सर्वोपचार रुग्णालय तसेच महापालिकेच्या भरतीय रुग्णालयातही आयुर्वेद निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा दिली. यानंतर पीडीकेव्हीमध्येही हे डॉक्टर निरंतर सेवा देत आहेत. सलग दोन महिन्यांपासून कोविड योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या या डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचे मानधन शासनाकडून दिले गेले नाही. दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे गुरुवारी अकोल्यात असताना विद्यार्थ्यांनी मानधन मिळण्यासंदर्भात निवेदन दिले होते. निवासी डॉक्टरांना मानधन मिळावे, यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनीही आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे आग्रह धरला होता. यानंतर आरोग्य मंत्री टोपे यांनी क्षणाचाही विलंब न लावता आयुर्वेद निवासी डॉक्टरांना मानधन देण्याचा निर्णय घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांना निर्देश दिलेत. त्यामुळे आयुर्वेद निवासी डॉक्टरांचा मानधनाचा मार्ग मोकळा झाला.
‘त्या’ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होईल मोठी मदत
वैद्यकीय शिक्षण घेत असताना कोरोनासारख्या महामारीमध्ये निवासी डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. हे सर्व डॉक्टर मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे मिळणारे मानधन हे त्यांच्या शिक्षणासाठी मोठी मदत होणार आहे.
४० डॉक्टर देत आहेत रुग्णसेवा
पातूर येथील ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय तसेच अकोल्यातील रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयातील ४० निवासी डॉक्टर आहेत. विनावेतन रुग्णसेवा देत आहेत. गरजेनुसार यामध्ये आणखी वीस डॉक्टर रुग्णसेवा देणार आहेत. त्यामुळे आता एकूण ६० आयुर्वेद निवासी डॉक्टर कोरोना महामारीत रुग्णसेवा देणार आहेत.