बाबा भांड यांना ना हरकत दिली तरी कुणी?
By admin | Published: August 14, 2015 11:15 PM2015-08-14T23:15:41+5:302015-08-14T23:15:41+5:30
आयुक्त कार्यालयाकडून शोध सुरू; पश्चिम व-हाडात अधिका-यांना विचारणा.
राजेश शेगोकार /बुलडाणा : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी प्रख्यात साहित्यीक व प्रकाशक बाबा भांड यांची नियुक्तीवर उठलेले वादळ शमण्याची चिन्हं दिसत नाहीत. फसवणूक प्रकरणात आरोपी असतानाही त्यांच्या नियुक्तीबाबत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ना हरकत देण्यात आली होती, असे वक्तव्य शिक्षण मंत्र्यांनी केल्यानंतर, ती वादग्रस्त ना हरकत नेमकी दिली तरी कुणी, याचा शोध आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी युद्ध पातळीवर घेतला. त्यासाठी पश्चिम वर्हाडातील सर्व जिल्हा प्रशासनांना विचारणा करण्यात आली. साहित्य संस्कृती मंडळाचे प्रमुखपद हे साहित्य क्षेत्रात अतिशय महत्वाचे मानले जाते. या पदावर बाबा भांड यांची नियुक्ती झाल्यानंतर साहित्यक्षेत्रातून आक्षेप घेतला जात आहे. या आक्षेपामध्ये भांड यांच्यावर बुलडाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे. साक्षरता अभियानाच्या काळात नवसाक्षरांना साहित्य पुरविण्याच्या व्यवहारात गैरप्रकाराची तक्रार झाली होती. या प्रकरणात भांड हे आरोपी असून त्यांना पोलीस कोठडीतही ठेवण्यात आले होते. बुलडाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्यावरही अशाच प्रकरणात गुन्हा दाखल असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. साक्षरता अभियानाचे साहित्य पुरविण्यात शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असणारा साहित्यीक साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी कसा, हा प्रश्न साहित्य वतरुळातून उपस्थित होत असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, भांड यांच्या नियुक्तीसंदर्भात ना हरकत नसल्याची माहिती अमरावती विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली होती, असे वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. याबाबत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय मात्र अनभिज्ञ आहे. शुक्रवारी आयुक्त कार्यालयातून बुलडाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वाशीम जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, सामान्य प्रशासनचे उप मुख्यकार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांना याबाबत विचारणा करण्यात आली. भांड यांच्या प्रकरणात बुलडाणा येथील न्यायप्रविष्ट प्रकरणाची मोठी अडचण असल्यामुळे बुलडाणा जिल्हा प्रशासनानेही त्यांच्या अखत्यारीतील विविध कार्यालयांमध्ये विचारणा केली. यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, याबाबत मंत्रालयातून विचारणा होत असल्याचे पश्चीम वर्हाडातील सर्वच जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांनी स्पष्ट करून, याबाबत जास्त माहिती देण्यास नकार दिला. काही साहित्यीकांनी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदासाठी कुणाच्याही शिफरशीची गरज नसते; मात्र त्या व्यक्तीच्या संदर्भात प्रशासनाकडून माहिती घेतली जाते. भांड यांचे कार्यक्षेत्र मराठवाडा असले तरी त्यांच्या एकूणच ह्यबायोडाटाह्णमध्ये बुलडाणा अडचणीचा विषय ठरत असल्याने, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर यासंदर्भात दोषारोपण केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. *भांड यांच्या बाबतीतही 'निशाणी डावा अंगठा' ज्या साक्षरता अभियानाच्या साहित्य पुरवठा प्रकरणात भांड दोषी आहेत, त्या अभियानावरच प्रख्यात लेखक रमेश इंगळे उत्रादकर यांनी 'निशाणी डावा अंगठा' ही कादंबरी लिहीली असून, तिला अनेक पुरस्कारही मिळाले.याच कादंबरीवर आधारीत चित्रपटही गाजला. याच 'निशाणी डावा अंगठा' या विधानाचा प्रत्यय शुक्रवारी जिल्हा प्रशासनात आला. अनेक अधिकार्यांना कोण हे भांड, आणि बुलडाण्याशी त्यांचा काय संबध असा प्रश्न पडला होता. काही अधिकार्यांनी आपल्या कार्यालयाने भांड यांची कोणत्या पुरस्कारासाठी शिफारस केली होती का, याचीही विचारणा कनिष्ठांना करून आपल्या 'साहित्य क्षेत्राविषयीच्या' ज्ञानाचा प्रत्यय दिला.