बबनराव चौधरी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष
By Admin | Published: June 30, 2016 01:54 AM2016-06-30T01:54:54+5:302016-06-30T01:54:54+5:30
अकोला महानगर अध्यक्षपदी माजी आमदार बबनराव चौधरी यांची नियुक्ती केली.
अकोला : काँग्रेसने बुधवारी संध्याकाळी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या असून, अकोला महानगर अध्यक्षपदी माजी आमदार बबनराव चौधरी यांची नियुक्ती केली आहे. अकोला महानगर अध्यक्ष पदासाठी मोठी दावेदारी असतानाही बबनरावांनी या पदावर मारलेली बाजी राजकीय क्षेत्रात चर्चेची ठरली आहे. काँग्रेसच्या अकोला महानगर अध्यक्ष पदासाठी पक्षातील दिग्गज इच्छुक होते. अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता महानगर अध्यक्ष पदाची दीर्घ कारर्कीद असलेले मदन भरगड यांना संधी हवी होती, तर पक्षाला नवे नेतृत्व देऊन संजीवनी देण्यासाठी राजेश भारती यांच्यासारखे कॉंग्रेसचा वारसा असलेले किंवा निखिलेश दिवेकर यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी मिळेल, अशीही अपेक्षा होती. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या बैठकीत उषाताई विरक, राजेश भारती व निखिलेश दिवेकर यांच्या नावाची चर्चाही झाली होती, यांच्यासह प्रदीप वखारिया, चंदू सावजी, विष्णू मेहरे हे सुद्धा इच्छुकांच्या शर्यतीत होते. मात्र, पक्षङ्म्रेष्ठींनी चर्चेतील नावांनाही बाजूला सारून बबनराव चौधरी यांच्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्याच्या हातात महानगराच्या काँग्रेसची सूत्रे सोपविली आहेत.