बाबासाहेब धाबेकरांचा भाजपशी घरोबा!
By admin | Published: October 10, 2014 01:14 AM2014-10-10T01:14:57+5:302014-10-10T01:14:57+5:30
काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा कारंजा मतदारसंघातील भाजप उमेदवारास पाठिंबा.
मनोज भिवगडे/ अकोला
राजकारणाची पंचावन्न वर्षे काँग्रेससाठी खर्ची घातल्यानंतर, विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मुलाच्या नावाची शिफारस वाशिमधील एका माजीमंत्र्याने करावी, अशी अट टाकल्याने नाराज झालेले माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपशी घरोबा केला आहे.
कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघ अकोल्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाबासाहेब धाबेकर यांचा गड राहिला आहे. येथून दोन वेळा निवडून आलेल्या बाबासाहेबांनी काँग्रेसकडे मुलासाठी कारंजातून उमेदवारीची मागणी केली होती. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि कारंजा मतदारसंघाशी त्यांची जुळलेली नाळ बघता पक्षाने उमेदवारी देणे अपेक्षित असताना, त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी त्रयस्थ व्यक्तीने शब्द द्यावा असे सांगण्यात आले. काँग्रेसच्या या भूमिकेवर धाबेकरांनी नाराजी व्यक्त करून, कारंजातील भाजपचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मतदानासाठी पाच दिवसांचा अवधी शिल्लक असताना बाबासाहेबांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे.
कारंजा मतदारसंघात आमच्या कार्यकर्त्यांना कोणी वाली राहिला नव्हता. त्यांना पक्षात सन्मान दिला जात नव्हता. त्यांची कामे होत नव्हती. पक्षाकडून मलाही अपमानास्पद वागणूक मिळाली. पक्षाचे जिल्ह्याशी संबंधित निर्णय घेतानाही मला विचारणा केली जात नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भल्यासाठी कारंजा मतदारसंघात भाजपला पाठिंबा दिला, असे बाबासाहेब धाबेकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.