जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बच्चन सिंग; संदीप घुगे यांची वर्षभरात बदली
By आशीष गावंडे | Published: January 2, 2024 03:35 PM2024-01-02T15:35:39+5:302024-01-02T15:35:48+5:30
बच्चन सिंग यांनी स्वीकारला पदभार, वाशिम जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना बच्चन सिंग यांनी गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न केले.
अकोला : जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची वर्षभरात शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागेवर बच्चन सिंग यांना पदस्थापना देण्यात आली आहे. शासनाने १ जानेवारी रोजी बच्चन सिंग यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केल्यानंतर आज मंगळवारी सिंग यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
वाशिम जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना बच्चन सिंग यांनी गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न केले. यासोबतच अंमलदारांचे कल्याण, सामाजिक कार्यात योगदान, नवनवीन पायाभूत सुविधांची निर्मिती करून जिल्ह्यात पोलिस दलाची प्रतिमा उंचावली होती. अवैध धंद्यांविरुद्ध प्रतिबंधक कारवाया करून वचक निर्माण केल्याचे चित्र होते. वाशिम येथून त्यांची बदली झाल्यानंतर ते पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. आता ते अकोला जिल्ह्याची सूत्रे सांभाळतील.
दंगल उसळल्यामुळे नाराजी
तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची बदली झाल्यानंतर २२ ऑक्टोबर २०२२ रोजी संदीप घुगे यांची अकोल्यात नियुक्ती करण्यात आली होती. गत ऑक्टोबर महिन्यात त्यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. दरम्यान, मे २०२३ मध्ये अकोला शहरात दोन समुदायात दंगल उसळल्यानंतर त्यांच्या कामकाजाबाबत लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोलल्या जाते. घुगे यांची बदली केल्यानंतर त्यांना पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.