लाचखोर शिवाजी नाईकवाडेला पोलीस कोठडी
By admin | Published: April 30, 2016 01:41 AM2016-04-30T01:41:00+5:302016-04-30T01:41:00+5:30
आरोपीस ४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकोला: सागवान झाडे तोडण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार ३00 रुपयांची लाच मागणार्या लाचखोर सहायक वनसंरक्षक शिवाजी नाईकवाडे यास शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पातूर जंगलातील सागवान झाडे तोडण्यासाठी वाशिम जिल्हय़ातील एका कंत्राटदाराला अकोला वनसंरक्षक कार्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्राची गरज होती. त्यासाठी कंत्राटदाराने वनसंरक्षक कार्यालयाकडे रीतसर अर्ज केला. ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे काम वनसंरक्षक कार्यालयातील सहायक वनसंरक्षक शिवाजी नाईकवाडे यांच्याकडे असल्याने कंत्राटदाराने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नाईकवाडे याने एका सागवान झाडाचे १00 रुपये या प्रमाणे १२३ झाडे तोडण्यासाठी सुमारे १२ हजार ३00 रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी कंत्राटदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख उत्तम जाधव यांनी प्रकरणाची सखोल चौकशी केली असता शिवाजी नाईकवाडे याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट होताच त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.