बच्चू कडूंची शेतकऱ्यांसह दिल्लीकडे कूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:31 AM2020-12-05T04:31:27+5:302020-12-05T04:31:27+5:30
फोटो पी ०४ बच्चू कडू फोल्डर तिवसा : राजधानी दिल्लीत लाखो शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून जोरदार ...
फोटो पी ०४ बच्चू कडू फोल्डर
तिवसा : राजधानी दिल्लीत लाखो शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून जोरदार आंदोलन चालविले आहे. त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यमंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांसह शुक्रवारी गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीला रवाना झाले. राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळ परिसरातून त्यांनी उपस्थितांमध्ये आंदोलनाचे स्फुल्लिंग चेतविले.
दिल्लीला पोहोचण्यासाठी आम्ही ज्या-ज्या राज्यातून जाऊ, त्या-त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालू. त्यात पहिला क्रमांक मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा असेल, असा इशारा ना. बच्चू कडू यांनी दिला. यावेळी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग जवळपास दोन तास ठप्प होता. आंदोलकांनी ट्रकवर चढून वाहने रोखली. यावेळी ना. कडू हे स्वत: दुचाकीने दिल्लीकडे रवाना झाले.
केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा; अन्यथा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह दिल्लीला येऊन शेतकऱ्यांसोबत अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा ना. कडू यांनी तीन दिवसांपूर्वी दिला होता. त्याअनुषंगाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून ‘प्रहार’चे हजारो कार्यकर्ते दुचाकी, ट्रॅक्टरने राष्ट्रसंतांच्या समाधीस्थळी दाखल झाले. ना. कडू यांच्या मार्गदर्शनानंतर ते आपापल्या वाहनांनी दिल्लीकडे रवाना झाले.
----------------------