बच्चू कडू यांच्यावर अकोल्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:46 PM2019-12-31T15:46:52+5:302019-12-31T15:47:58+5:30
बच्चू कडू यांची प्रहार संघटना अकोल्यातही प्रभावी असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातही उतरलेली आहे.
मुंबई: महाविकास आघाडी सरकारचा लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. यात एकूण 43 मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र अकोला जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असतानाही मंत्रीमंडळ विस्तारात अकोला जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला. त्यामुळे आता इतर जिल्ह्यातील मंत्र्यांकडे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात येणार असून, बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे.
बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्याचे असून, तेथील आमदार यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. साहजिकच त्या अमरावतीच्या पालकमंत्री पदावर राहतील त्यामुळे बच्चू कडू यांना नजीकच्या अकोल्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना अकोल्यातही प्रभावी असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणातही उतरलेली आहे.
तर कडू यांनाही अकोला राजकीय दृष्टीने सोयीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्री झालेले आमदार बच्चू कडू यांच्यावर अकोल्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता राजकीय वर्तळात व्यक्त केली जात आहे.
त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यालगतच्या बुलडाणा जिल्ह्यातील डॉ. राजेंद्र शिंगणे आणि यवतमाळमध्ये संजय राठोड यांनाही मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्याही नावांची चर्चा आहे. तसेच यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविलेले नागपूरचे ना. नितीन राऊत यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र ऐनवेळी अकोल्याच्या पालकमंत्री पदावर कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.