Bachchu Kadu: "पुढची सत्ता प्रहारची...", बच्चू कडूंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 12:47 PM2022-06-25T12:47:23+5:302022-06-25T12:48:17+5:30
Bachchu Kadu: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतराचे वारे सुरू झाले आहे. मात्र, दुसरीकडे कायद्याचा व नियमांचा आधार घेत बंडखोरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून होत आहे.
- राजेश शेगोकार
अकोला : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतराचे वारे सुरू झाले आहे. मात्र, दुसरीकडे कायद्याचा व नियमांचा आधार घेत बंडखोरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सरकार पक्षाकडून होत आहे. त्यांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली नाही, तर या गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागेल. अशावेळी भाजप आणि प्रहार हे दोनच पर्याय बंडखोरांकडे आहेत. या पृष्ठभूमीवर चार दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी, ‘पुढची सत्ता प्रहारची, मुख्यमंत्री आमचाच,’ असे विधान केले होते. तो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या दिवसापासून बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील प्रहार जनशक्ती पक्ष आहे. या पक्षाचे आमदार राजकुमार पटेल हे शिंदे यांच्यासोबत सुरत येथे पोहोचले होते, दुसऱ्या दिवशी कडू सहभागी झाले. ‘आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत,’ असे यापूर्वीच कडू यांनी जाहीर केले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी कडू यांनी माध्यमांसोबत बोलताना आता अपक्षांना चांगले दिवस येतील, लवकरच आमची सत्ता येईल, पुढचा मुख्यमंत्री ‘प्रहार’चाच राहील, असे विधान केले होते. बच्चू कडू यांचे हे विधान मिश्कील असल्याची चर्चा त्यावेळी झाली. या विधानाला राजकीयदृष्ट्या गांभीर्याने घेतले गेले नाही. मात्र, सध्याच्या पेचप्रसंगात प्रहार जनशक्ती पक्ष हा शिंदे गटाकडे असलेला पर्याय पाहता बच्चू कडू यांना या बंडाची पूर्वकल्पना होती, अशी शंका उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासमवेत असलेल्या आमदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली नाही, तर त्यांना भाजपात विलीन व्हावे लागेल. भाजपमध्ये विलीन होणे हे शिंदे यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. ‘मी शिवसेनेचाच’ असे आजही ते ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे आमदारकी वाचविण्यासाठी तसेच राज्यातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी शिंदे यांच्यासमोर प्रहार जनशक्ती या पक्षाचा विश्वासू पर्याय शिल्लक राहतो.