पाणीटंचाईग्रस्त गावातील महिलांनी अडविली बच्चू कडू यांची गाडी
By नितिन गव्हाळे | Published: March 28, 2024 07:45 PM2024-03-28T19:45:03+5:302024-03-28T19:48:05+5:30
खांबोरा गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही.
अकोला : बारुल्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न भीषण झाला असून, उगवा, पाळोदी, आगर व लगतच्या गावांमध्ये देखील पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर महिला आक्रमक झाल्या आहेत. पाळोदी येथे एका कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री बच्चू कडू जात असल्याचे पाहून, पाळोदी गावातील महिलांनी त्यांची चारचाकी गाडी अडवून पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. खांबोरा गावात गेल्या एक महिन्यापासून पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही.
अनेकदा संबंधित तसेच ग्रामसेवक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र तोडगा निघाला नाही. दरम्यान, अकोला तालुक्यातील ग्राम पाळोदी गावात एका कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू जात होते. दरम्यान, उगवा फाट्यावर पाणीटंचाईग्रस्त गावातील महिलांनी त्यांना थांबवून पाणीटंचाईची समस्या दूर करण्याची मागणी या महिलांनी केली. यावेळी पालकमंत्री नसलो तरी पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो, असे सांगत, आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना फोन लावून खांबोरा गावातील पाणीटंचाईची माहिती दिली आणि पिण्यासाठी पाणी नसल्याने, ग्रामस्थ व महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. तात्पुरत्या स्वरूपात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे, अशा सूचना बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.