आता शेतावरच घेता येईल कमी खर्चात जीवाणू खताचे उत्पादन !
By Admin | Published: October 23, 2016 02:12 AM2016-10-23T02:12:25+5:302016-10-23T02:12:25+5:30
डॉ. पंदेकृविचे तंत्रज्ञान; नैसर्गिक उत्पादनात होईल वाढ.
अकोला, दि. २२- फळ किंवा तृणधान्यवर्गीय पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जीवाणू (बुरशीजन्य) खत हे प्रभावी तंत्रज्ञान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. कमी खर्चात शेतावर तयार होणारे आणि मातीतील बहुमूल्य स्फुरद घटकांचे प्रमाण संतुलित ठेवणार्या या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नैसर्गिक अन्नधान्य व फळे मिळतील, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.
शेतातील मातीतील स्फुरद, कॅल्शियम व जस्ताचे प्रमाण कमी झाले आहे. ही धोक्याची सूचना असून, शेतातील या घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. या घटकांचे प्रमाण कमी झाल्याने त्याचे थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतो. रासायनिक खताचा वापर करू न या तीनही घटकांचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने जीवाणू खतांचा वापर वाढवून नैसर्गिक शेतीकडे शेतकर्यांना वळविण्याची गरज असल्याने अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने या खताचे प्रात्यक्षिक शेतकर्यांसाठी लावले आहे. गहू, ज्वारी व मका आदी तृणधान्याच्या मुळावर जीवाणू खते तयार होणार्या बुरशीला वाढविता येते. नारळाच्या दशांचा भुसा (कोकोपीट) खासकरू न यासाठी वापरला जातो. एका या जीवाणू खताची निर्मिती करता येते. नारळाचा भुसा ७ ते १0 रुपये किलो आहे. एक किलो ते पाहिजे तेवढय़ा प्रमाणात खत तयार करता येते.
या खताचा वापर केल्यास उत्पादन तर वाढतेच, जमिनीची जलधारणा क्षमताही वाढते. कमी झालेले स्फुरद, कॅल्शियम, जस्त तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यात भर पडत असल्याने झाडांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. फळांचा आकारही वाढतो.
-जीवाणू खत कोकोपीटपासून तयार करता येते. हे नैसर्गिक खत असल्याने फळे, अन्नधान्य बिनविषारी मिळते. शेतकर्यांना जोडधंदा म्हणूनही या खताचा व्यवसाय करता येतो.
डॉ. दिनेश पैठणकर,
ज्येष्ठ शास्त्रज्ञ, लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र,
डॉ. पंदेकृवि, अकोला.