दिग्रस बु.-तुंलगा रस्त्याची दुरवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:56+5:302021-09-26T04:21:56+5:30
राहुल सोनोने दिग्रस : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. - लावखेड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांसह ग्रामस्थ त्रस्त झाले ...
राहुल सोनोने
दिग्रस : पातूर तालुक्यातील दिग्रस बु. - लावखेड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांसह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
परिसरात गावांसाठी वाडेगाव मुख्य बाजारपेठ असल्याने या मार्गाने वाहनांची गर्दी असते. या मार्गाने तुलंगा, शहापूर, लावखेड, वाहळा, खेट्री, चतारी, सांगोळा, पिंपळखुटा, आदी गावांतील ग्रामस्थ, वाहनचालक, प्रवासी ये-जा करतात. रस्त्यावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचते, परिणामी वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरून सकाळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. रस्त्यावरून जाताना खड्डा चुकविताना अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
--------------------------
अवजड वाहनांची वर्दळ वाढली
दिग्रस बु. - तुंलगा रस्त्याने अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-----------------------
रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी
रस्ता खड्डेमय झाला असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी मनोज गवई, प्रसेनजित रोकडे, सुमेध हातोले, सावन कुमार गवई, बबलू तायडे, प्रतीक गवई, आदी विद्यार्थ्यांकडून होत आहे.