शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांची तूर ठेवणारा भांडारपाल बडतर्फ

By admin | Published: May 3, 2017 01:28 AM2017-05-03T01:28:58+5:302017-05-03T01:28:58+5:30

राज्य वखार महामंडळाच्या गोदामात २० लाखांपेक्षाही अधिक रकमेचा घोटाळा

Baddharf, a businessman who buys traders in the name of farmers | शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांची तूर ठेवणारा भांडारपाल बडतर्फ

शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांची तूर ठेवणारा भांडारपाल बडतर्फ

Next

सदानंद सिरसाट -अकोला
राज्य वखार महामंडळाच्या गोदामात भाड्याने धान्य ठेवताना ५० टक्के सवलतीचा लाभ देण्यासाठी व्यापाऱ्यांची तूर शेतकऱ्यांच्या नावे ठेवल्याप्रकरणी मंगरुळपीर येथील तत्कालीन भांडार व्यवस्थापक एम.टी. बुंदेले यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सोबतच अकोला येथील गोदामात रुजू झाल्यापासून धान्याचा ताळमेळही न दिल्याने त्याबाबत वसुलीची कारवाईही लवकरच केली जाणार आहे. त्यामुळे वखार महामंडळाच्या गोदामातही धान्याचा मोठा अपहार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामध्ये शिधापत्रिकाधारकांना वाटप करावयाचे धान्य भारतीय खाद्य महामंडळाकडून साठवले जाते. त्यासाठी गोदामांमध्ये त्या साठ्याचे आरक्षणही ठेवण्यात आले. सोबतच जेथे खाद्य महामंडळाचे आरक्षण नाही, त्या ठिकाणी सर्वांसाठी भाडेतत्त्वाने धान्य साठा केला जातो. त्यामध्ये शेतकरी असल्यास त्यांना भाड्याच्या रकमेत ५० टक्के सवलत दिली जाते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, हा त्यामागे उद्देश आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील गोदामात भाडेतत्त्वावर धान्य ठेवण्याची सोय आहे. त्या गोदामात २०१० ते २०१४ पर्यंतच्या काळात मोठ्या प्रमाणात खासगी व्यक्तींचे धान्य ठेवण्यात आले. ते ठेवताना व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या तुरीसह इतर धान्य शेतकऱ्यांच्या नावे ठेवण्यात आले. त्यातून व्यापाऱ्यांना ५० टक्के भाडे सवलतीचा लाभ देण्यात आला. सोबतच धान्य ठेवल्याचा कालावधी कमी दाखवून त्यातून उरणाऱ्या रकमेतून स्वत:चे खिसे भरण्याचे काम भांडार व्यवस्थापक एम.टी. बुंदेले यांनी केले. हा प्रकार भाडे पावत्यांवर खोडतोड करून केला. चौकशीत हे स्पष्ट झाले. त्याशिवाय लेखा परीक्षणातही बुंदेले यांनी वखार महामंडळाची केलेली फसवणूक उघड झाली. त्यामुळेच त्यांची विभागीय चौकशी लावून २०१४ मध्ये त्यांची बदली अकोला येथील गोदामात करण्यात आली. या गोदामातही बुंदेले यांनी आधीचाच कित्ता गिरवला. गोदाम सुरू झाल्यापासून बडतर्फ होण्यापर्यंत धान्यासोबतच इतर कोणत्याही साहित्याचा हिशेब वरिष्ठ कार्यालयाला दिला नाही. त्याची दखल थेट वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील यांनीच घेतली.

विभागीय चौकशीला केराची टोपली
मंगरुळपीर येथील २० लाख रुपयांपेक्षाही अधिक अपहारप्रकरणी महामंडळाने बुंदेले यांची विभागीय चौकशी सुरू केली. त्या चौकशीला उपस्थित न राहणे, कोणत्याही नोटिसला उत्तर न देणे, वरिष्ठांचे आदेश दडवून ठेवणे, यासारखे प्रकार बुंदेले यांनी सातत्याने केले. त्यामुळेच त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

अकोला गोदामाचा प्रभार देण्यास टाळाटाळ
वखार महामंडळाने बुंदेले यांच्यावर कारवाईसाठी आधीच तयारी केली होती. त्यासाठी आधी त्यांना पदावरून हटवत तेथे खामगाव येथील भांडारपाल एस.जी. ढवळे यांची बदली करण्यात आली. त्यांना प्रभार देण्यासही बुंदेले यांनी तब्बल तीन महिने टाळाटाळ केली. डिसेंबरमध्ये रुजू झालेल्या ढवळे यांना गोदाम तपासणीनंतर २१ मार्च रोजी एकतर्फी प्रभार देण्यात आला.

कारवाईत प्रचंड गोपनीयता
वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील यांनी दिलेले बडतर्फीचे आदेश केवळ त्यांचे कार्यालय आणि बुंदेले यांच्याकडेच आहेत. अमरावती विभागीय कार्यालय, अकोला गोदामात त्याची कुठलीही माहिती नाही. महामंडळाने बडतर्फ केल्याचे सांगत बुंदेले यांनी गोदाम सोडला ते परत आलेच नाहीत.

अकोला गोदामातही मोठा घोळ
अकोला येथील गोदामाची तपासणी वखार महामंडळाचे अमरावती विभागीय व्यवस्थापक अडकमोल यांनी केली. त्या दिवशी असलेल्या साठ्यानुसार पुढे ढवळे यांना प्रभार देण्यात आला. त्याआधी गोदामातील धान्य साठ्यात मोठी तफावत असल्याची माहिती आहे.

आधीचे भांडार व्यवस्थापक बुंदेले यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाल्याचे पत्र कुरियरने त्यांच्या हातात पडले. ते वाचून त्यांनीच उपस्थितांना त्याबाबत सांगून निघून गेले.
- एस.जी. ढवळे, भांडार व्यवस्थापक, अकोला गोदाम.

Web Title: Baddharf, a businessman who buys traders in the name of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.