बॅडमिंटनची वाढली क्रेझ
By Admin | Published: August 29, 2016 01:19 AM2016-08-29T01:19:26+5:302016-08-29T01:19:26+5:30
अकोल्यात सहा ठिकाणी बॅडमिंटन सरावाकरिता सुविधा उपलब्ध.
अकोला, दि. २८: रिओमध्ये भारतीय कन्याच पुढे आल्यात. पी.व्ही.सिंधूनं बॅडमिंटनमध्ये पदक मिळवून, अखिल भारतातील मुलींना बॅडमिंटनचे वेड लावलं. पहाटे चार वाजल्यापासून या मुली कोर्टवर येतात. अकोल्यात रिओ ऑलिम्पिकपूर्वी तीस ते चाळीस मुली-महिला बॅडमिंटन कोर्टवर यायच्या. आता रिओनंतर बॅडमिंटनची क्रेझ वाढल्याने झपाट्याने प्रमाण वाढून ही संख्या साठपर्यंंत पोहोचली आहे. अकोल्यात सहा ठिकाणी बॅडमिंटन सरावाकरिता सुविधा उपलब्ध आहे. मित्र समाज क्लब, ऑफीसर्स क्लब, आयएमए हॉल, पीकेव्ही मैदान आणि वसंत देसाई क्रीडांगण बहूद्देशीय सभागृहामध्ये बॅडमिंटन खेळण्याची उत्तम सोय आहे. एकट्या वसंत देसाई क्रीडांगणावर ४५ मुली नियमित बॅडमिंटन सरावाकरिता येतात. येथे एकूण चार कोर्ट आहेत. अकोल्यातल्या ३0 मुली राज्यस्तर बॅडमिंटनपटू आहेत. तर प्राची ताथुरकर ही राष्ट्रीय खेळाडू आहे. प्रियंका पिल्ले हिने आखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. प्रियंका ही विद्यापीठ संघाची कर्णधार होती. अकोल्यात एका तपापूर्वी बॅडमिंटन बर्यापैकी खेळले जात होत; परंतु 'श्रीमंतांचा खेळ' पुरता र्मयादित राहिला. मित्र समाज क्लबने बॅडमिंटनचा सुवर्णकाळ बघितला आहे. मात्र, त्यानंतर पदाधिकार्यांमध्ये आपसी मतभेद झाल्याने मित्र समाज क्लबची इमारत आता एकटी पडली आहे. परंतु वसंत देसाई क्रीडांगणावर मात्र, आज भरगच्च बॅडमिंटनपटूंची गर्दी असते. एवढेच नव्हेतर जिल्हाधिकारी जी.श्रीकांतदेखील येथे नियमित खेळायला येऊन खेळाडूंना प्रोत्साहन देतात. सन २00५ पासून एनआयएस कोच निषाद डिवरे यांनी वसंत देसाई क्रीडांगण येथे बॅडमिंटन खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला केवळ पाच मुलीचं प्रशिक्षण घ्यायला यायच्या. आज मात्र, मुलांपेक्षा मुलींचीच संख्या जास्त आहे. नियमित ११ बॅचपैकी ६ बॅच केवळ मुलींच्या आहेत. येथे मुलींना नियमित फिटनेस ट्रेनिंग झाल्यानंतर बॅडमिंटन शिकविल्या जाते. येथे चार कोर्ट असून, नियमित सरावाकरिता पुरेसे आहे. पूर्वी श्रीमंतांचाच खेळ म्हणून ओळखल्या जाणार्या बॅडमिंटन खेळात आता नॉयलॉनचे शटल आल्यामुळे सर्वसाधारण व्यक्ती हा खेळ खेळायला लागला आहे. हे शटलदेखील शंभर ते दीडशे रुपयाला मिळत असल्याने गरीब घरचे मुले-मुली हा खेळ खेळू शकत नाहीत. परंतु जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने करार पद्धतीने येथे प्रशिक्षण केंद्र चालविण्यास दिले असल्याने येथे अत्यल्प शुल्क आकारू न बॅडमिंटन प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे प्रशिक्षक निषाद डिवरे यांनी सांगितले.