बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’च्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:49 PM2019-05-24T13:49:59+5:302019-05-24T13:50:15+5:30
दोन प्रमुख मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाने गुरुवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: ‘व्हीव्हीपॅट’च्या कागदी मतपत्रिकांची शंभर टक्के मोजणी करा तसेच निवडणूक आयोगाने तयार केलेले ५६ सी, ५६ डी आणि ४९ एमए हे असंविधानिक नियम रद्द करा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चाने गुरुवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले. या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देऊन गुरुवारी सायंकाळी आपली दुकाने काही काळाकरिता बंद ठेवली.
मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या निर्देशनात भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. अकोल्यातदेखील राजेंद्र इंगोले यांच्या नेतृत्वात अशोक वाटिका येथून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. महाराणा प्रताप बागेजवळ सभा घेण्यात आली. या मार्गात येणाºया व्यापारी प्रतिष्ठानांना आंदोलकांनी विनंती करू न दुकान बंद करण्याचे आवाहन केले, तसेच आपल्या मागण्या समजावून सांगितल्या. दुकानदारांनी आपली दुकाने काही काळाकरिता बंद करू न आंदोलनाला प्रतिसाद दिला. अकोल्यात मुख्य शहरासह वाडेगाव, पातूर, बाळापूर येथून आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला.
हे झाले होते सहभागी
आंदोलनात सारंग निखाडे, मुरलीधर पखाले, स्वप्निल कुलट, करण तेलगोटे, प्रशीक आठवले, गौतम सिरसाट यांच्यासह भीम आर्मी, भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भारतीय विद्यार्थी सेना, मूलनिवासी महिला संघ, इंडियन इंजिनिअर्स प्रोफेशन असोसिएशन, इंडियन लॉयर असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.