काजल कांबे आत्महत्या प्रकरणात आई, मुलाचा जामीन अर्ज फेटाळला
By सचिन राऊत | Published: July 29, 2023 05:19 PM2023-07-29T17:19:53+5:302023-07-29T17:20:13+5:30
मुर्तीजापूर येथील रहीवासी काजल शर्मा यांचा विवाह संकेत कांबे याच्यासाेबत १६ फेब्रुवारी २०१८ रोजी झाला होता
अकाेला : मुर्तीजापूर शहरातील प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ तथा दंत महाविद्यालयाचे संचालक डॉ. राजेश कांबे यांची सून काजल संकेत कांबे (२४) हिने २० जून रोजी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणातील आराेपी मृतक महिलेची सासू अनुश्री कांबे व पती संकेत कांबे या दाेघांचा अटकपुर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला़
मुर्तीजापूर येथील रहीवासी काजल शर्मा यांचा विवाह संकेत कांबे याच्यासाेबत १६ फेब्रुवारी २०१८ रोजी झाला होता. कांबे कुटुंबीयांनी तिला सुरुवातीला काही दिवस चांगली वागणूक दिली. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतर तिचे सासरचे ‘तू गरीब घरची आहे, आमच्या मनाप्रमाणे लग्न झाले नाही, या कारणांवरून सतत अमानुषपणे मारहाण करून तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सासरच्यांनी तिचे जगणे असह्य केल्यानंतर या त्रासाला कंटाळून काजलने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिचे वडील संजय फुलचंद शर्मा (५२) यांनी मुतीजापूर शहर पाेलिस ठाण्यात केली हाेती़ यावरुन पाेलिसांनी काजलचा पती संकेत राजेश कांबे (३०), सासरे राजेश रामदास कांबे (५२), ससू अनुश्री राजेश कांबे (५०), साक्षी राजेश कांबे (२५) या चौघांवर ४९८ अ, ३०६, ३४ या कलमानुसार गुन्हा दाखल केला हाेता़ त्यानंतर या प्रकरणी सासू अनुश्री कांबे व पती संकेत कांबे या दाेघांनी अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला़ मात्र जिल्हा व सत्र न्यायाधीश अ क्षिरसागर यांच्या न्यायालयाने या दाेन्ही आराेपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
दाेन गाेंडस मुले आईच्या प्रेमाला मुकली
काजलने रेल्वेसमाेर उडी घेउन आत्महत्या केली़ मात्र तिला दोन गोंडस मुले असून या मुलांची वाताहात सुरु झाल्याची चर्चा मुर्तीजापूर शहरात आहे. पाच वर्षापुर्वी काजलचे लग्ण झाल्यानंतर त्यांना दाेन मुले झाली़ ही दाेन्ही मुले सद्या लहाण असतांनाच आइने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याने या मुलांना मात्र आइचे प्रेम आता कधीही मीळणार नसल्याचे वास्तव आहे़