दहा लाख रुपयांच्या नकली नोटा प्रकरणातील आरोपींना जामीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:26 AM2021-02-26T04:26:03+5:302021-02-26T04:26:03+5:30
प्राप्त माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी सुभाष खंडू ससाने यांच्याकडून केशव आयाजी सरोदे, रा. मालेगाव यांनी सहा महिने ...
प्राप्त माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी सुभाष खंडू ससाने यांच्याकडून केशव आयाजी सरोदे, रा. मालेगाव यांनी सहा महिने आधी दोन लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम देण्यास केशव सरोदे टाळाटाळ करीत असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापशी येथे हॉटेल बजरंगमध्ये पैसे परत करण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी आरोपी केशव सरोदे यांनी कॉन्ट्रॅक्टर विनोद साठेची मदत घेऊन सुभाष ससाने यांना दोन लाखांच्या नकली नोटांचे बंडल दिले. यामध्ये मनोरंजन बँक लिहिलेल्या नकली नोटा होत्या. नोटांवर आणि खाली दोन खऱ्या नोटा लावलेल्या होत्या. या प्रकरणी पातूर पोलिसांनी कापशी परिसरात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १० लाख रुपये किमतीच्या नकली नोटा जप्त केल्या. या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी केशर सरोदे व कॉन्ट्रॅक्टर विनोद साठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जिल्हा न्यायालयात कॉन्ट्रॅक्टर विनोद साठे व केशव सरोदे यांच्यातर्फे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर दोन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद झाला. न्यायालयाने काही अटींवर दोन्ही आरोपींचा जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड. नरेंद्र बेलसरे, ॲड. मंगेश वाकोडे, ॲड. हेमंत सपाटे यांनी काम पाहिले. सरकारतर्फे ॲड. रेलकर यांनी बाजू मांडली.