बाळापूर तालुक्यातील ८७ गावांत होतोय अशुद्ध पाण्याचा पुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 08:16 PM2018-01-09T20:16:48+5:302018-01-09T20:17:22+5:30

बाळापूर : तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी, कर्मचारी भूगर्भातून उपसा केलेले पाणी शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया न करता थेट नळाद्वारे ग्रामीण भागात अशुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा करीत आहेत.

In Balapur taluka, there are 87 villages in the supply of unclean water! | बाळापूर तालुक्यातील ८७ गावांत होतोय अशुद्ध पाण्याचा पुरवठा!

बाळापूर तालुक्यातील ८७ गावांत होतोय अशुद्ध पाण्याचा पुरवठा!

googlenewsNext
ठळक मुद्दे६६ ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात फिल्टर नाही

अनंत वानखडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या ८७ गावांत पिण्याच्या पाण्याचे एकमेव स्रोत भूगर्भातील पाणी आहे. बाळापूर शहराची पाणी पुरवठा योजना वगळता ग्रामीण भागात कुठेही धरणातून पाणी पुरवठा नाही. भूगर्भात (विहीर, बोअरवेल)द्वारे पाणी हे पाणी पुरवठय़ाच्या टाकीत टाकून ते साठवले जाते. त्या पाण्याच्या जलशुद्धीकरणासाठी स्थानिक ग्रामपंचायतमार्फत ब्लिचिंग पावडर, तुरटी टाकून शुद्ध झालेले पाणी नळाद्वारे नागरिकांना पिण्यासाठी सोडण्याची प्रक्रिया असते; परंतु ग्रामपंचायत व ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी, कर्मचारी मात्र भूगर्भातून उपसा केलेले पाणी शुद्धीकरणाची कुठलीही प्रक्रिया न करता व कुठेही विहीर, बोअरवेलमध्ये ब्लिचिंग पावडर न टाकता अथवा शुद्धीकरण यंत्र न बसवता ग्रामीण भागात थेट नळाद्वारे अशुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा करीत आहेत.
तालुक्यातील मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पारस, कन्हेरी (गवळी) येथे बाळापूरवरून मन नदीच्या पात्राशेजारी मोठय़ा विहिरी खोदून पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा होतो. वाडेगाव येथेही बाहेरून पाणी पुरवठा होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जात असल्याने पाणी खेचणार्‍या यंत्राद्वारे पाणी खेचून पाण्याच्या टाकीत पोहोचत नसल्याने अनेक गावांत पाणी पुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्या आहेत. भूगर्भातून थेट पाणी पुरवठा करणार्‍या पाइपद्वारे नागरिकांना नळाद्वारे पाणी सोडले जात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. शासनाकडून संभाव्य पाणीटंचाई निवारण्याच्या योजनावर मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. शासनाने अनेक गावांत दीर्घकालीन पाणी पुरवठा योजना राबवल्या. पारस, वाडेगाव, कान्हेरी, खिरपुरी, मनारखेडसारख्या गावात राबवलेल्या योजना कुचकामी ठरल्या.
तालुक्यात नैसर्गिक देण म्हणून पाच मोठय़ा नद्या-नाले आहेत; परंतु शासन व लोकप्रतिनिधींनी पाणी पुरवठय़ासाठी नियोजनच केले नाही. त्यामुळे दरवर्षी भरपूर पाऊस होवो अथवा न होवो पाणीटंचाई ही नित्याचीच बाब झाली आहे. पाणीटंचाई नैसर्गिक असली, तरी त्यावर मात करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाची आहे. दरवर्षी पाणीटंचाईच्या नावाखाली प्रत्येक ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगातील निधी खर्च करतो; परंतु एकाही ग्रा.पं.ने गावासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा (फिल्टर प्लांट) उभारला नाही. पाणी शुद्धीकरण यंत्र न बसविल्याने व पाणीटंचाईचे कारण पुढे करून पाणी खेचणार्‍या मशिनरीवर ताण पोहोचत असल्याने तांत्रिक कारण पुढे करून शुद्धीकरण (ब्लिचिंग, तुरटी)चा खर्च वाचवून मात्र नागरिकांना दूषित पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भाग हा खारपाणपट्टय़ात येतो. क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी, पोटाच्या आजारात वाढ होत आहे. अनेकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. ग्रामीण भागातील आजार नियंत्रणासाठी आरोग्य विभाग पाण्याचे नमुने प्रयोगशाळेला वारंवार पाठवत असते. आलेल्या नमुन्याची माहिती गटविकास अधिकार्‍यांमार्फत ग्रामसेवकांना लेखी पत्र दिले जाते; परंतु लाल, पिवळ्या रंगाच्या दूषित पाण्यावर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना राबविणार्‍या यंत्रणा उपाययोजना करण्याऐवजी ग्रामस्थांना पाणीटंचाईचे कारण पुढे करून पाणी शुद्धीकरणाची जबाबदारी झिडकारून ग्रामस्थांना स्वत:च्या घरात आर.ओ. लावण्याचा केविलवाणा सल्ला मात्र देतात.
पारस प्रकल्पांतर्गत २0१४-१५ मध्ये प्रकल्प बाधित पारस, मांडोली, कोळासा, मनारखेड, सातरगाव, भिकुंडखेड, शेळद, मांडवा गावांना प्रकल्पाच्या सीएसआर फंडातून जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात येईल, असे दिलेले आश्‍वासन देणारे व ग्रामपंचायतचे पदाधिकारीही विसरले; मात्र जलशुद्धीकरण यंत्र अद्यापही लागले नाही. तालुक्यात कारंजा (रमजानपूर) येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांमार्फत १0 गावांना पाणी पुरवठा केला जातो. लोहारा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून लोहारा व कवठा गावाला पाणी पुरवठा केला जातो. निंबा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून वझेगाव, निंबा गावाला पाणी पुरवठा केला जातो. 

भूगर्भातील पाण्यावर निर्भर असलेली गावे
वाडेगाव, पारस, टाकळी (खोजबोड), काझीखेड, स्वरूपखेड, मोरवा, जानोरी, कान्हेरी (गवळी), उरळ बु., उरळ खु., धनेगाव, व्याळा, पिंपळगाव, तांदळी, शेळद, खिरपुरी बु., खिरपुरी खु., खामखेड, मोरगाव (सादीजन), खंडाळा, चिंचोली गणू, नांदखेड, मोरझाडी, अंत्री (मलकापूर), कोळासा, कुपटा, मांडवा, सातरगाव, गायगाव, निमकर्दा, कवठा, लोहारा, बटवाडी बु., नागद, मालवाडा, दगडखेड, सागद, हातरुण, टाकळी (निमकर्दा), मनारखेड, बोरगाव (वैराळे), सोनाळा, मांजरी, नकाशी, भरतपूर, कळंबी (महागाव), कळंबी खु., रिधोरा, दधम, बटवाडी खु., देगाव, मानकी, वझेगाव, हाता, डोंगरगाव, नया अंदुरा, अंदुरा, शिंगोली, निंबा फाटा या ठिकाणी जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) आहेत. त्यातील बहुतांश क्षेत्र खारपाणपट्टय़ात असताना पाण्याच्या टाकीत पाणी भरून ते शुद्धीकरण न करता परस्पर टाकी न भरता सरळ नळाद्वारे सोडण्यात येत आहे. 

Web Title: In Balapur taluka, there are 87 villages in the supply of unclean water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.