बळेगाव, वणी येथे घर, गोठय़ाला आग; सहा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:48 AM2018-02-10T01:48:45+5:302018-02-10T01:49:07+5:30
वणी वारुळा: अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरातील वणी येथे रमेश केशवराव पालखडे, गणेश पालखडे यांच्या गोठय़ाला ९ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागल्याने ५ लाखांच्या जवळपास नुकसान झाले, तर बळेगाव येथे घरांना आग लागून १ लाख रुपयांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी वारुळा: अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरातील वणी येथे रमेश केशवराव पालखडे, गणेश पालखडे यांच्या गोठय़ाला ९ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागल्याने ५ लाखांच्या जवळपास नुकसान झाले, तर बळेगाव येथे घरांना आग लागून १ लाख रुपयांचे नुकसान झाले.
बळेगाव येथील मजूर वर्ग शेतात कामाला निघून गेल्यावर येथील झोपडपट्टीमध्ये अचानक आग लागली. लहान मुलांना व गावकर्यांना ही आग दिसताच गोंधळ उडाला तर महिलांनी घरामधील गॅस सिलिंडर बाजूच्या शेतात नेऊन टाकले, तर गावकरी धावून आले. प्रत्येकाच्या घरातील पाणी टाकूनसुद्धा आग आटोक्यात येत नव्हती. तेव्हा अकोट येथील अग्निशामक दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. ही अग्निशामक दलाची गाडी अकोटात पोहचत नाही तर वणी येथे शेतीचे सामान ठेवलेल्या गोठय़ाला दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत रमेश केशवराव पालखडे यांच्या शेतीचे सामान, फवारणी मशीनसह शेतीचे साहित्य, स्प्रिंकलर पाइपसह तुरीचे कट्टे, नवीन ताडपत्र्यांसह ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे. गणेश केशवराव पालखडे यांचे कुटार व शेतीचे साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये त्यांचे एक लाखांच्या जवळपास नुकसान झाले. तसेच बळेगाव येथील आयशाबी व साबीर खा पठाण यांचे घर जळल्याने १ लाखाचे घरातील साहित्य व पाइप जळून खाक झाले. काशिनाथ गवई यांचे घर जळून घरातील सामान जळून खाक झाले. तेव्हा या आगीमुळे परिसरातील जनता संभ्रमात पडली आहे. नेमके आगीचे कारण समजू शकले नाही. यावेळी वणी व बळेगाव येथे अकोट ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच तलाठी झटाले, तलाठी रतन यांनी पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयास सादर केला आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी होत आहे.