कुपोषणाला आळा घालण्यासाठी अंगणवाडीमध्ये बालपंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 04:56 PM2019-02-10T16:56:23+5:302019-02-10T16:56:40+5:30
अकोट : लहानपणीच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आदिवासीबहुल भागातील कुपोषणाला आळा बसावा, या उद्देशाने अकोट तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून बालपंगत हा अभिनव उपक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पाचपाटील यांनी सुरू केला आहे.
अकोट : लहानपणीच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आदिवासीबहुल भागातील कुपोषणाला आळा बसावा, या उद्देशाने अकोट तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून बालपंगत हा अभिनव उपक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पाचपाटील यांनी सुरू केला आहे.
अकोट तालुक्यात १२६ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये बचत गटांमार्फत खिचडी, उसळ व इतर शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आदिवासीबहुल भागात कुपोषणाला आळा बसावा, त्यादृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा प्रारंभ ९ फेब्रुवारी रोजी करतवाडी येथील अंगणवाडीतून करण्यात आला. गटविकास अधिकारी तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. पाचपाटील यांच्या संकल्पनेतून या बालपंगत उपक्रमामध्ये अंगणवाडी असलेल्या गावातील दानशूर व्यक्तींचा लोकसहभाग घेऊन अंगणवाडीमध्ये गोडधोड व सकस आहाराची बालपंगत दर आठवड्यात एक दिवस बसविण्यात येणार आहे. करतवाडी येथील पहिल्या बालपंगतीला बीडीओ पाचपाटील, करतवाडी ग्रा.पं.च्या सरपंच फरजाना खातून नसिरोद्दीन, उपसरपंच करुणा आग्रे, ग्रामसेवक आर. एम. राऊत, अंगणवाडी सेविका वनमाला कोकाटे, मदतनीस मंगला बोदडे, मिलिंद नितोने, सैयद अहमद, रोशन चिंचोळकर, नसिरोद्दीन, चेतन भारंबे, श्रीकांत कोकाटे, आदेश आग्रे, दीपक आग्रे, रोशन जामनिक, जुबेर खान, गणेश कोकाटे, आर. ए. रहेमान, अभिजित कोकाटे, राजेश डोंगरे, आशिष आग्रे, योगेश भारंबे, अजय आग्रे यांच्यासह गावकरी व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. या उपक्रमाकरिता करतवाडी येथील नीलेश आग्रे व किशोर आग्रे यांनी विशेष सहकार्य केले.
लोकवर्गणीतून गणवेश उपलब्ध करणार!
अंगणवाडीमधील विद्यार्थी वेगवेगळ्या पोशाखात येतात; परंतु हे विद्यार्थी कॉन्व्हेंटप्रमाणे एकाच गणवेशात यावेत, याकरिता लोकवर्गणीतून त्यांना गणवेश उपलब्ध करण्याची संकल्पना मांडत गटविकास अधिकारी बाबाराव पाचपाटील यांनी एक हजार रुपयांची मदत केली. गावातील इतरांनीसुद्धा मदत करून विद्यार्थ्यांना गणवेश देणार असल्याचे सांगितले.
बालपंगत हा उपक्रम राबविण्याकरिता ग्रामीण भागात जास्तीत जास्त भर देण्यात येणार आहे, तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबविण्यात यावा, याकरिता प्रयत्न करण्यात येतील.
- बाबाराव पाचपाटील, प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला