बाळापूर मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला; नितीन देशमुख यांना उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 01:35 PM2019-09-30T13:35:40+5:302019-09-30T13:35:50+5:30
एकमेव बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
अकोला: जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला नेमका कोणता मतदारसंघ सुटणार, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत शिवसेना-भाजप युतीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी एकमेव बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कधीकाळी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांतून भगवा फडकविणाऱ्या शिवसेनेच्या मजबूत तटबंदीला २००९ नंतर सुरुंग लागला. २०१४ मध्ये शिवसेना-भाजपने युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. यामध्ये सेनेचा मजबूत गड मानल्या जाणाºया अकोट आणि अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले. तसेच अकोला पश्चिम व मूर्तिजापूर मतदारसंघातही भाजपने विजयी पताका कायम ठेवली. केवळ बाळापूर मतदारसंघात भाजपला पराभवाची चव चाखावी लागली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपने युती होणारच, असे अनेकदा ठामपणे स्पष्ट केले. जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असल्याने जिल्ह्यातून शिवसेनेच्या वाट्याला नेमका कोणता मतदारसंघ सुटणार, याबद्दल राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. घटस्थापनेच्या दिवशी युतीची अधिकृत घोषणा होईल, असे सेना-भाजपने स्पष्ट केले होते. रविवारी सायंकाळपर्यंतही युतीची घोषणा झाली नाही. अशा स्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला. ही बाब लक्षात घेता, युतीची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे चित्र समोर आले आहे.