बाळापूर : राजकीय समीकरण बदलणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:10 PM2019-10-05T13:10:18+5:302019-10-05T13:10:28+5:30
बंडखोरांची उमेदवारी कायम राहिल्यास राजकीय समीकरण बदलणार आहे.
- अनंत वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर: बाळापूर मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांनी स्वपक्षाच्या उमेदवारांविरोधात दंड थोपटून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या बंडखोरांची उमेदवारी कायम राहिल्यास राजकीय समीकरण बदलणार आहे.
बाळापूर मतदारसंघ हा परंपरागत भाजप, काँग्रेसचा मानल्या जातो; परंतु यंदा ही जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, भाजप-सेना युतीने नितीन देशमुख, काँग्रेस-राकाँ आघाडीचे संग्राम गावंडे यांना उमेदवारी जाहीर केली; परंतु त्यांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते आमदार बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांची व समर्थकांची नाराजी आहे. भाजप, काँग्रेसला ही जागा सोडावी लागल्यामुळे भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. वंचित बहुजन आघाडीचे आमदार बळीराम सिरस्कार, प्रा. डॉ. संतोष हुशे, गजानन दांदळे, डॉ. रहेमान खान, अश्वजित सिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवार डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची अडचण वाढविली आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तायडे, माजी जि. प. सदस्य पंढरी हाडोळे, चंद्रशेखर चिंचोळकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेस-राकाँ आघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. यासोबतच माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिवसंग्रामचे संदीप पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून युतीला अडचणीत आणले आहे. एवढेच नाही, तर स्वाभिमानी पक्षाकडून उद्योजक तुकाराम दुधे यांनीही अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीचा फटका या तीनही उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे नाराज इच्छुकांची या उमेदवारांना मनधरणी करून बंडखोरी थोपवून धरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.
दरम्यान, वंबआ, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले तीनही उमेदवार प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, संग्राम गावंडे, नितीन देशमुख हे नवखे आहेत. त्यापैकी नितीन देशमुख गत निवडणुकीचा अनुभव गाठीशी आहे. पुंडकर, गावंडे यांना बाळापूर मतदारसंघाचा अभ्यास असला तरी, त्यांना गावोगावी फिरून जनसंपर्क साधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. हे सर्व बंडखोर उमेदवार रिंगणात कायम राहतात की माघार घेतात, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.