पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती मेळघाटातील बांबूची राखी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 06:22 AM2018-08-26T06:22:05+5:302018-08-26T06:23:36+5:30
मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित रक्षाबंधन सोहळ्याचे
तेल्हारा (जि. अकोला) : मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित रक्षाबंधन सोहळ्याचे निमंत्रण या केंद्रास मिळाले आहे. या सोहळ्यात कोरकू महिला कारागिरांकडून पंतप्रधान बांबूची राखी बांधून घेणार आहेत.
बांबू म्हणजे मेळघाटचं हिरवं सोनंच. याच बांबूच्या कलात्मक वस्तू निर्मितीतून मेळघाटातील वनवासींना स्वावलंबी बनविण्याचे कार्य बांबू केंद्रामार्फत सुनील देशपांडे करीत आहेत. या बांबूच्या राख्या अतिशय सुंदर व कलात्मक असून, पर्यावरणपूरक आहेत. या राख्या खूप लोकप्रिय झाल्या असून, देश-विदेशातून या मेळघाटी राख्यांना मागणी वाढत आहे. या केंद्रामधील कोरकू बांधवांच्या कलाकौशल्यास मिळालेला हा सन्मान आहे. या निमित्ताने मेळघाटची कलाकुसर राष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, असे लवादाच्या कोरकू महिला व केंद्राचे प्रमुख सुनील देशपांडे यांनी सांगितले.