‘त्या ’ पुस्तकावर बंदी आणा, संभाजी बिग्रेडची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:46+5:302021-05-25T04:21:46+5:30
अकाेला : छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल 'रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ...
अकाेला : छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल 'रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र' या पुस्तकात लेखक गिरीश कुबेर यांनी अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. या लिखाणामधून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार केला जात आहे असा आराेप करत या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने साेमवारी करण्यात आली. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक होते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. चारित्र्यसंपन्न, स्वराज्य निष्ठित व स्वराज्यरक्षक असणाऱ्या राजावर रयतेचेसुध्दा प्रचंड प्रेम होते. अशा महान छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे त्यामुळे या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी. तसेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत अशी मागणी संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, अकाेला जिल्हा अध्यक्ष प्रशांत भारसाकळ, जिल्हा संघटक स्वप्निल गावंडे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष सागर कामे, कुणाल नेरकर, रूषीकेश देशमुख आदींनी केली आहे.