केळी पिकाला उन्हाचा फटका!
By Admin | Published: March 5, 2016 02:27 AM2016-03-05T02:27:05+5:302016-03-05T02:27:05+5:30
विदर्भात वाढत्या तापमानाने उत्पादनावर परिणाम.
खामगाव: सध्या उन्हाची तीव्रता वाढली असल्याने केळी पिकाला फटका बसतोय. शेतकर्यांनी जिवापाड जपलेले हे पीक सध्या उन्हाच्या झळांनी होरपळत असून, याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे.
राज्यात ४४ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आहे. त्यापैकी निम्मे क्षेत्र हे जळगाव जिल्ह्यात आहे. केळीच्या पिकासाठी हा जिल्हा प्रसिद्ध असला तरी पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, चिखली, देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील आकोट, पातूर, तेल्हारा, बाश्रीटाकळी, अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी, परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार या ठिकाणांसह यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये केळीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. काही वर्षांपूर्वी जमिनीतील पाण्याच्या पातळीत सुधारणा झाल्यामुळे केळी पिकाकडे शेतकर्यांचा कल होता; मात्र गत तीन वर्षांत पर्जन्यमान घटल्याने जलपातळी खोल गेली आणि केळीच्या लागवडीवर विपरीत परिणाम झाला.
उन्हाळ्याची चाहूल आता लागली असून, दुपारचे उन्ह केळी पिकाला उद्ध्वस्त करू पाहतेय. विदर्भात जेमतेम उन्हाळा सुरू होत असताना तापमान साधारणत: ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याने उष्ण वारे, तीव्र सूर्यप्रकाश यामुळे केळीच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहेत. सध्या फळाची साल पिवळी पडणे, फणीतून केळी गळून पडणे, उष्ण हवेमुळे पाने फाटणे हे दुष्परिणाम पाहावयास मिळत आहेत. तापमान ४0 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास झाडाची वाढ खुंटणे यांसह अनेक विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधीच पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्यातच उत्पन्नात घट झाल्यास उत्पादनखर्च निघेल की नाही, ही समस्या शेतकर्यांसमोर ह्यआह्ण वासून उभी आहे.