तहसीलदार, नायब तहसीलदारांचे कामबंद; जिल्ह्यात महसूल विभागाचे कामकाज ठप्प!
By संतोष येलकर | Published: April 3, 2023 08:21 PM2023-04-03T20:21:10+5:302023-04-03T20:21:19+5:30
‘ग्रेड पे’ वाढविण्याची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली निदर्शने
अकोला : नायब तहसीलदारांचे ‘ग्रेड पे’ वाढविण्याच्या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने सोमवार, ३ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार आणि संघटनेचे पदाधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत, मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना सादर करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्ह्यात महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले.
राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग २ चे पद आहे; मात्र नायब तहसीलदार पदाचे वेतन राजपत्रित वर्ग २चे मिळत नसल्याने राज्यातील नायब तहसीलदारांचे ‘ग्रेड पे’ वाढविण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु, या मागणीची दखल शासनस्तरावर अद्याप घेण्यात आली नाही. त्यामुळे नायब तहसीलदारांचे ‘ग्रेड पे’ वाढविण्यात यावे, या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने ३ एप्रिलपासून राज्यात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सोमवारी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे विभागीय सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, प्रतीक्षा तेजनकर, स्वप्नाली काळे, मीरा पागोरे, महेंद्र आत्राम, अतुल सोनोने, हर्षदा काकड आदींसह जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित होते.
नागरिकांना नाहक फटका!
तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्यातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले. कामबंद आंदोलनामुळे महसूलविषयक कामानिमित्त कार्यालयांत जिल्ह्यातील तहसील व संबंधित कार्यालयात आलेल्या नागरिकांना काम न होताच घरी परतावे लागत आहे.