लग्न समारंभात बॅंड पथक,संगीत कार्यक्रमांना परवानगी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:26 AM2020-11-11T11:26:33+5:302020-11-11T11:26:41+5:30
Mission Begin Again, Akola News परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी दिला.
अकोला: ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत गुरुवार, १२ नोव्हेंबरपासून जिल्हयात लग्न समारंभांमध्ये बॅंड पथकांना तसेच संगीत कार्यक्रम करणाऱ्या व्यावसायिकांना परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी दिला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊन मिशन बिगेन अगेन अंतर्गत विविध सेवा पूर्ववत सुरु होत आहेत. त्यामध्ये लग्न समारंभांमध्ये बॅंड पथक व्यावसायिकाना वाद्य वाजविण्याची परवानगी देण्याची मागणी अकोला जिल्हा बॅंड असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली होती. त्यानुषंगाने शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ व इतर आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करुन लग्न समारंभात जिल्ह्यातील बॅंड पथकांना तसेच संगीत कार्यक्रम करणाऱ्या व्यावसायिकांना १२ नोव्हेंबरपासून अटी व शर्तीनुसार परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
‘या’ अटी व शर्तीचे करावे लागणार पालन!
लग्न समारंभात उपस्थित ५० व्यक्तींमध्ये बॅंड पथक व संगीत कार्यक्रम करणाऱ्या सदस्यांचा समावेश असेल. बॅंड पथक व संगीत कार्यक्रम पथकातील सदस्यांचे नियमीत थर्मल स्कॅनिंग करुन त्यांची नोंद करुन घेणे आवश्यक आहे. बॅंड पथक व संगीत कार्यक्रमासाठी आवश्यक साहित्याचे निर्जंतुकीकरण करुन वापरणे बंधनकारक आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.