बँकेत नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:09+5:302021-04-25T04:18:09+5:30
दर्यापूर व नागपुरातील दोन आरोपी अटकेत 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी अकोला : लहान उमरी परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवकास ...
दर्यापूर व नागपुरातील दोन आरोपी अटकेत
26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
अकोला : लहान उमरी परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवकास बँकेत नोकरी लावण्याचे बनावट नियुक्तपत्र देणाऱ्या दोन जणांच्या टोळीला रामदासपेठ पोलिसांनी अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लहान उमरी येथील रहिवासी अनुप ज्ञानेश्वर पिंजरकर या युवकांसह अनेक युवकांना दर्यापूर येथील रहिवासी डॉ. श्रीकांत मंगेश बानुवाकुडे, वय ३२ वर्षे आणि मानेवाडा रोड, नागपूर येथील रहिवासी देवानंद रमेश अनासने या दोघांनी वन विभाग तसेच बँकेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून लाखो रुपयांची रक्कम उकळली. अनुप पिंजरकर यांच्याकडून सुमारे ९ लाख ६० हजार रुपयांची रक्कम बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन उकळली. त्यानंतर नोकरी लागत नसल्याने युवकाने तगादा लावला असता या दोन्ही आरोपींनी अनुप पिंजरकर यांना बँकेत नोकरी लावण्यासाठीचे बनावट नियुक्तीपत्र दिले. युवक हे नियुक्तीपत्र घेऊन बँकेत नोकरीसाठी गेला असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता डॉ. श्रीकांत बानुवाकोडे व देवानंद अनासने या दोघांनी ९ लाख ६० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे अनुपच्या लक्षात आले. त्याने या प्रकरणाची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी या दोन आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर डॉ. श्रीकांत बानुवाकोडे याला दर्यापूर येथून तर देवानंद अनासने याला नागपूर येथून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. या दोन जणांच्या टोळीने अनेक युवकांना लाखो रुपयांनी गंडविल्याची माहिती आहे. या दोघांनी वनविभाग, बँक तसेच काही संस्थांमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली युवकांना लाख रुपयांनी चुना लावल्याचे समोर येत आहे.