अंगणवाडी सेविकांचे मानधन होणार बँकेत जमा!
By admin | Published: July 3, 2017 01:54 AM2017-07-03T01:54:03+5:302017-07-03T01:54:03+5:30
अकोला : राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यानुसार जुलै महिन्याचे मानधन त्यांना खात्यातच मिळण्याची तयारी झाली आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मासिक मानधन मिळण्यास २ ते ३ महिन्यांचा विलंब होत असल्याने त्यांची आर्थिक व मानसिक कुचंबणा होत होती. याची दखल घेत आयुक्तालयातील लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कनिष्ठ स्तरावरील मानधन वितरणाचे काम आयुक्त स्तरावर घेतले. त्यासाठी ते आवश्यक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या प्रणाली अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयामार्फत राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन एकत्रितरीत्या जुलै २०१७ पासून आधार संलग्न बँक खात्यात दरमहा थेट जमा करण्यात येणार आहे. राज्यपातळीवर दोन लाख कर्मचाऱ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट मानधन जमा करणारा एकात्मिक बालविकास सेवा योजना हा देशातील पहिला विभाग आहे. केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत महिला व बालविकास विभागाची योजना ग्रामीण, आदिवासी व शहरी भागात राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सहा महिने ते सहा वर्षे वयाच्या बालकांना पोषण आहार, आरोग्यसेवा पुरविणे, पूर्वशालेय शिक्षण देणे, तसेच बालमृत्यू कमी करणे, तीव्र कमी वजनाची जन्मलेली बालके, कुपोषित बालके यांच्या आरोग्य सुधारणेचा कार्यक्रम तसेच गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व महिला यांच्यासाठी आहार, आरोग्य व शिक्षणविषयक योजना राबविण्यात येतात.