बँक कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:47 AM2019-10-23T10:47:42+5:302019-10-23T10:47:57+5:30
अकोला शहरात स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्र महात्मा गांधी मार्ग शाखेसमोर ८० कॉमरेडसनी सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने दिलीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: एआयबीईए-बेफी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत देशभरातील बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी २२ आॅक्टोबरच्या देशव्यापी संपात सहभागी होत बँकेसमोर निदर्शने दिलीत.
दोन्ही संघटनांचे ५ लाखांवर सभासद मंगळवारच्या एक दिवसीय देशव्यापी लाक्षणिक संपात सहभागी झाले होते.
सरकारने जाहीर केलेल्या बँका एकत्रीकरणाच्या विरोधात हा संप छेडला गेला. ज्या प्रक्रियेत सरकार दहा बँकांचे एकत्रीकरण करून फक्त चार बँका जिवंत ठेवत आहे. सहा बँका बंद करत आहे. सहयोगी बँकांचे स्टेट बँकेत व देना तसेच विजया बँकेचे बडोदा बँकेत विलीनीकरण केल्यानंतर या बँकांतून जवळ-जवळ २ हजार शाखा बंद करण्यात आल्या आहेत. एकीकडे सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद करत आहेत तर दुसरीकडे खासगी क्षेत्रातून स्मॉल फायनान्स बँकांना परवाने देत आहेत. बँकांच्या विश्वासार्हतेबाबत संशयाचे वातावरणात असताना बँक खासगीकरणाला प्रोत्साहन देणारे हे सरकारचे हे धोरण जनताविरोधी आहे. त्यामुळे २२ आॅक्टोबर रोजी देशव्यापी संप छेडण्यात आला. अकोला शहरात स्थानिक बँक आॅफ महाराष्ट्र महात्मा गांधी मार्ग शाखेसमोर ८० कॉमरेडसनी सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने दिलीत. संपामध्ये दिलीप पिटके, श्याम माईणकर, उमेश शेळके, प्रवीण महाजन, माधव मोतलग, लोडम, उखळकर, देशपांडे, बैस, इंगळे, बेलोकार, मिश्रा, मावंदे, अनिल मावळे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.