बँकेने सील लावलेल्या घराचा कर्जदाराने घेतला ताबा!
By Admin | Published: April 20, 2017 01:53 AM2017-04-20T01:53:04+5:302017-04-20T01:53:04+5:30
अकोला : बँकेने सील लावल्यानंतर कर्जदार दाम्पत्याने फ्लॅटच्या दाराचे सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अकोला : नागपूर येथील बँकेने सातव चौकातील अपार्टमेंटमधील फ्लॅटला सील लावल्यानंतर कर्जदार दाम्पत्याने फ्लॅटच्या दाराचे सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी बुधवारी सायंकाळी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नागपूरमधील सीताबर्डी येथे राहणारे तक्षक बिंदुसार मून (३६) यांच्या तक्रारीनुसार सातव चौकातील सूर्यकांत ओंकारराव मानकर, सहकर्जदार विद्या सूर्यकांत मानकर यांनी गृहकर्जासाठी त्यांचा शिव अपार्टमेंटमधील फ्लॅट गहाण ठेवून एका बँकेकडून कर्ज घेतले; परंतु त्यांनी ६ लाख ८० हजार रुपये कर्जाची परतफेड न केल्यामुळे कंपनीने वारंवार नोटिस बजावल्या. त्यांनी नोटिसचे उत्तर न दिल्यामुळे कंपनीने ८ मार्च २०१७ रोजी पोलीस बंदोबस्तात फ्लॅटचा ताबा घेतला आणि फ्लॅटला सील लावले. त्यानंतर सूर्यकांत व विद्या मानकर यांनी कंपनीच्या ताब्यातील फ्लॅटचे सील तोडून घरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे बुधवारी दुपारी दिसून आले. कर्जदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून फ्लॅट ताब्यात घेतल्याप्रकरणी कंपनीने रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सूर्यकांत व विद्या मानकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.