‘कनेक्टिव्हिटी’अभावी बँक व्यवहार ठप्प
By admin | Published: August 10, 2014 01:39 AM2014-08-10T01:39:20+5:302014-08-10T20:58:26+5:30
एटीएम बंद, नागरिकांना हेलपाटे
अकोला - इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये आलेल्या अडचणींमुळे बँकांचे व्यवहार शनिवारी मोठय़ाप्रमाणावर प्रभावित झालेत. राष्ट्रीयीकृत बँकांसह मध्यवर्ती बँकेच्या अनेक शाखांमधील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार त्यामुळे ठप्प पडले होते. एचडीएफसी, बँक ऑफ इंडिया आणि अँक्सीस या तीन बँकांचे एटीएम वगळता शहरातील बहुंतांश बँकांचे एटीएम बंद होते. रक्षाबंधन उत्सवाच्या पूर्वसंध्येला बँकांचे व्यवहार बंद पडल्याने नागरिकांना रोख रकम काढण्यासाठी भटकावे लागले. शनिवारी अर्धा दिवस सुटी तसेच रविवारी सुटी सोबतच रक्षाबंधन असल्याने बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी नागरिकांची नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. एकीकडे बँकांमध्ये खातेदारांची गर्दी असताना दुसरीकडे बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखांमध्ये नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने व्यवहार बंद पडले होते. त्यामुळे बँकेत रोख जमा करणे, रोख काढणे, ट्रान्सफर करण्यासह इतर सर्वच व्यवहार बंद ठप्प झाले होते. विद्युत पुरवठा खंडित असणे किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे कनेक्टिव्हिटीच्या अडचणी नेहमीच उद्भवतात; मात्र शनिवारी बँकांमध्ये अर्धा दिवसांचे कामकाज असताना नेमके त्याच वेळेत इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे संगणकावरील कामकाज बंद पडले. बँकांमधील व्यवहार बंद असल्याने त्याचा परिणाम नेटवर्कने जोडलेल्या एटीएमवरही झाला. एटीएममधूनही व्यवहार होत नसल्याने नागरिकांना मन:स्थाप सहन करावा लागला. शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याने नागरिकांना रोख काढण्यासाठी भटकावे लागले
** या बँकेतील कनेक्टिव्हिटी गायब दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्रामीण भागातील अनेक शाखा, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या काही शाखा, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद यासह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही शाखांमध्ये नेट कनेक्टिव्हिटी नसल्याची माहिती बँकेच्या अधिकार्यांनी दिली. विद्युत पुरवठा खंडित किंवा वादळी वार्यामुळे कनेक्टिव्हिटी गायब होते, मात्र शनिवारी अशा प्रकारचे वातावरण नसताना अनेक बँकेतील नेट कनेक्टिव्हिटीचा लपंडाव सुरू असल्याने बँकेच्या अधिकारी-कर्मचार्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला.