‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’अभावी बँकेचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 02:26 PM2019-03-15T14:26:57+5:302019-03-15T14:27:22+5:30
अकोला: ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’अभावी स्टेट बँकेचे व्यवहार गत दोन दिवसांपासून ठप्प पडल्याने ग्राहकांचे धनादेश वटविणे बंद झाले आहे. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने बँकांनी फलक लावून तांत्रिक बिघाड असल्याचे जाहीर केले आहे.
अकोला: ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’अभावी स्टेट बँकेचे व्यवहार गत दोन दिवसांपासून ठप्प पडल्याने ग्राहकांचे धनादेश वटविणे बंद झाले आहे. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने बँकांनी फलक लावून तांत्रिक बिघाड असल्याचे जाहीर केले आहे. मार्च अखेरमुळे कर भरणाचा हिशेब जुळविणे आणि मागील थकबाकी घेण्या-देण्याचे व्यवहार सुरू असताना बँकेचे व्यवहार ठप्प पडल्याने अनेकांना त्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून स्टेट बँकेचे सर्व्हर डाउन असल्याने स्टेट बँकेत येणाऱ्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कुणाचे धनादेश वटविणे थांबले आहे, तर कुणाची रक्कम वळविण्याची प्रक्रिया थांबली आहे. बँकेच्या तांत्रिक बिघाडाचा फटका अकोल्यातील शेकडो ग्राहकांना सोसावा लागत आहे. अनेकदा सर्व्हर डाउनच्या समस्या पुढे येत असतानाही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही, असा आरोप ग्राहकांनी केला आहे. बँकेने पर्यायी व्यवस्था केलेली असतानादेखील अनेकदा बँकेचे व्यवहार ठप्प पडतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे ग्राहकांना सोसाव्या लागत असलेल्या भुर्दंडाविरुद्ध कुणी ग्राहक मंचात गेले, तर बँकेला नुकसान भरपाई देण्याची वेळ येऊ शकते.