पात्र-अपात्र शेतकरी ठरविण्याचा बँकांपुढे पेच

By admin | Published: July 14, 2017 02:02 AM2017-07-14T02:02:39+5:302017-07-14T02:02:39+5:30

बँकांनाच सूचना नाहीत; कर्जमाफीची कशी होणार अंमलबजावणी?

The banks are now in the process of fixing eligible-ineligible farmers | पात्र-अपात्र शेतकरी ठरविण्याचा बँकांपुढे पेच

पात्र-अपात्र शेतकरी ठरविण्याचा बँकांपुढे पेच

Next

संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाकडून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली; मात्र कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात बँकांना शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफी योजनेत पात्र, अपात्र शेतकरी ठरविण्याचा पेच बँकांपुढे निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असली, तरी अंंमलबजावणी कशी होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत प्रारंभी १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत गत २८ जून रोजी काढण्यात आला. त्यानंतर कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवित सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय गत आठवड्यात शासनामार्फत जाहीर करण्यात आला. परंतु, कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत.
त्यामुळे कर्जमाफी योजनेत पात्र आणि अपात्र शेतकरी कसे ठरविणार, याबाबतचा प्रश्न बँकांसमोर निर्माण झाला आहे.
त्यानुषंगाने शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली, तरी याबाबत बँकांना शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या नसल्याने, कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी होणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात शासनाकडून बँकांना सूचना केव्हा देण्यात येणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.

मार्गदर्शक सूचनाही नाही!
थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय २८ जून रोजी काढण्यात आला; मात्र या कर्जमाफी योजनेत पात्र ठरणारे शेतकरी आणि द्यावयाचा कर्जमाफीचा लाभ, यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचनादेखील अद्याप बँकांसह संबंधित यंत्रणांकडे प्राप्त झाल्या नाहीत.


कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत बँकांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र आणि अपात्र ठरणारे शेतकरी ठरविणे बँकांसाठी कठीण बाब आहे. शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतरच यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- तुकाराम गायकवाड
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

Web Title: The banks are now in the process of fixing eligible-ineligible farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.