‘ईव्हीएम’ एटीएम कार्डबाबत बँका उदासीन!
By admin | Published: April 7, 2017 12:48 AM2017-04-07T00:48:32+5:302017-04-07T00:48:32+5:30
व्यवहारात जुनेच कार्ड : रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची होतेय अवहेलना
संजय खांडेकर - अकोला
साधे मॅगनेटिक एटीएम कार्ड जमा करून बँक खातेदारांना नवीन ईव्हीएम कार्ड तातडीने देण्यात यावेत, असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले असतानाही अकोल्यात तब्बल पाच लाख ‘ईव्हीएम-चीप’विरहित असुरक्षित एटीएम कार्ड व्यवहारात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. नागरिक यापासून अनभिज्ञ असून बँक अधिकाऱ्यांनी अजूनही याबाबत गंभीरता बाळगलेली नाही.
इलेक्ट्रो मॅगनेटिक व्हेरिअन्ट चीप म्हणजे ईव्हीएम-चीप असलेले एटीएम कार्डच यापुढे बँकांनी ग्राहकांना द्यावेत, जुने कार्ड जमा करून बदलून द्यावेत, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने एका वर्षाआधी दिले असले, तरी अजूनही साधे मॅगनेटिकचे लाखो एटीएम कार्ड अकोल्यात सर्रास वापरात येत आहेत. नागरिकही याबाबत विचारणा करीत नसल्याने बँक अधिकाऱ्यांनीदेखील फारसे मनावर घेतलेले नाही. एटीएम कार्डच्या मागे असलेल्या साध्या (काळी पट्टी) मॅगनेटिक एटीएम कार्डाचे क्लोनिंग देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी झालेत. अनेकांच्या बँक खात्यातील रक्कम काढली गेली. ही बाब सायबर क्राइमने अधोरेखित केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने तातडीने नियमावलीत बदल करण्याचे ठरविले. त्यासाठी ईएमव्ही चीप असलेले एटीएम शोधले गेले. मोबाइल सेल्युलर सीमकार्डाप्रमाणे चिन्ह एटीएमवर लावण्यात आले. ग्राहकांचे जुने एटीएम कार्ड जमा करून तातडीने त्यांना ईव्हीएम एटीएम कार्ड देण्याचे निर्देश दिले; मात्र या आदेशाला राष्ट्रीय आणि इतर खासगी बँकांनीही ठेंगा दाखविला आहे. अकोल्यात सात लाख एटीएम कार्डधारक असून, त्यातील जवळपास पाच लाख खातेदारांकडे जुने साधे मॅगनेटिक एटीएम कार्ड आहेत. रिझर्व्ह बँकेचे निर्देश असताना बँकेचे अधिकारी या बाबींकडे लक्ष देण्यास तयार नाहीत आणि नागरिक तेवढे जागरूक नाहीत. त्यामुळे ज्या लोकांकडे साधे मॅगनेटिक एटीएम असतील, त्यांनी आपल्या बँकेत जाऊन ईव्हीएम चीपचे एटीएम कार्डची मागणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशान्वये जिल्ह्यातील सर्व बँकांनी जुने एटीएम कार्ड जमा करून, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असलेले ईव्हीएम कार्ड दिले पाहिजे. नागरिकांनीही तसा आग्रह संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाकडे धरावा.
-तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला.