पीक कर्जाच्या पुनर्गठनाकडे बँकांचा कानाडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 02:33 AM2016-05-11T02:33:41+5:302016-05-11T03:08:44+5:30
सव्वा लाखावर शेतक-यांच्या कर्जाचे १५ मेपर्यंत पुनर्गठनावर प्रश्नचिन्ह.
अकोला: दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा शेतकर्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, पीक कर्ज पुनर्गठनाच्या कामात बँकांकडून कानाडोळा करण्यात येत आहे. त्यामुळे १५ मेपर्यंत जिल्हय़ातील १ लाख ३३ हजार शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, पुन्हा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण कसे होणार होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्ज थकीत असलेल्या कर्जदार शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून, यावर्षीच्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गत २६ एप्रिल रोजी घेतला. कर्जदार शेतकर्यांच्या पीक कर्जाचे १५ मे पर्यंंत पुनर्गठन करावयाचे निर्देश आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातील १ लाख ३३ हजार शेतकर्यांच्या पीक कर्जाचे तातडीने पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्यांना पुन्हा कर्ज वाटप करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेमार्फत जिल्हय़ातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँक व संबंधित बँकांना २८ एप्रिल रोजी देण्यात आले. त्यानुसार शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, याबाबतची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याने १0 मे पर्यंत जिल्हय़ात पीक कर्ज पुनर्गठनाचे काम केवळ २0 टक्क्यावर पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पीक कर्ज पुनर्गठनाच्या कामाकडे बँकांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने पाच दिवसात (१५ मेपर्यंंत ) जिल्हय़ातील सर्व १ लाख ३३ हजार शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्यांना पुन्हा पीक कर्ज उपलब्ध करण्याच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.