तापमानात वाढ झाल्याने केळीची बाग सुकली!
By admin | Published: May 23, 2016 01:43 AM2016-05-23T01:43:05+5:302016-05-23T01:43:05+5:30
सौंदळा परिसरातील अनेक गावांमधील शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान.
सौंदळा (जि. अकोला) : सध्या मे अखेरीस तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सौंदळा परिसरातील बादखेड, वारखेड, वारी, कार्ला व सोनवाडी या गावांच्या शिवारातील अनेक बागायतदार शेतकर्यांच्या शेतातील केळीचे उभे पीक अक्षरश: सुकले आहे. यामुळे या बागायतदार शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सौंदळा परिसरातील अनेक गावांमध्ये वान धरणामुळे जलसमृद्धी आली आहे. या भागातील शेतकरी रोखीचे असलेले केळीचे व अन्य रोखीची पिके घेतात. यापैकी बादखेड, वारखेड, वारी, कार्ला, सोनवाडी येथील शेतकर्यांच्या शेतात उभ्या असलेल्या केळीच्या पिकाला ९ मे रोजी आलेल्या वादळी वार्याचा फटका बसून काही शेतातील केळीचे पीक उद्ध्वस्त होऊन शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्याबाबत तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार कृषी विभागाने सर्वेक्षण केले आहे. परंतु, अद्यापपर्यंंत संबंधित शेतकर्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही. त्या घटनेनंतर परिसरात तापमानात कमालीची वाढ होऊन शेतकर्यांच्या शेतातील केळीचे पीक सुकणे सुरू झाले. मागील १२ दिवसांत अनेक शेतकर्यांच्या शेतातील केळीचे पीक मोठय़ा प्रमाणात सुकले आहे. अशाप्रकारे आधी वादळी वार्यांमुळे व नंतर भीषण तापमानाने केळी उत्पादक शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हा या नुकसानाचे देखील शासनाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकर्यांना आर्थिक मदत व पीक विम्याची रक्कम तातडीने देण्याबाबत कार्यवाही करावी.जेणेकरून शेतकर्यांना खरिपाच्या पेरणीसाठी ती रक्कम कामी पडू शकेल, अशी केळी उत्पादक शेतकर्यांची मागणी आहे.