चार वाजता बार बंद, रस्त्यावरच दे दारू सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:34+5:302021-07-22T04:13:34+5:30
काेराेनाची पहिली लाट आल्यानंतर दारू विक्रीवर बंदी आणण्यात आली हाेती. त्यामुळे दारूची काळ्या बाजारात माेठ्या प्रमाणात विक्री झाल्याची अनेक ...
काेराेनाची पहिली लाट आल्यानंतर दारू विक्रीवर बंदी आणण्यात आली हाेती. त्यामुळे दारूची काळ्या बाजारात माेठ्या प्रमाणात विक्री झाल्याची अनेक प्रकरणेही घडली हाेती़ त्यानंतर आता दुसरी लाट आलेली असतानाच शासनाने कर मिळावा या उद्देशाने दारूची दुकाने सुरू ठेवली आहेत, मात्र त्यावर काही निर्बंध लादण्यात आली असून दुपारी ४ वाजेनंतर बार बंद करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. मात्र मद्यपींची दारू पिण्याची वेळ काम आटाेपल्यानंतर सायंकाळचीच असल्याने त्यांचे वांधे झाले हाेते. यावर मद्यपींनी जबरदस्त उपाय शाेधला असून, त्यांनी ४ वाजेच्या आत दारू विकत घेणे व कामकाज आटाेपल्यानंतर चकनासाेबत घेऊन माेकळ्या रस्त्यांवर तसेच खुल्या मैदानांमध्येच दारू पिण्याची जागा केली आहे. शहरातील बहुतांश मैदानांवर रात्रीच्या अंधारात दारूच्या ओल्या पार्ट्या सुरू असल्याचेही ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आले आहे.
रस्त्यावरच भरते मधुशाला
एमआयडीसीतील बहुतांश रस्त्यांवर सायंकाळनंतर शुकशुकाट असताे. त्यामुळे या परिसरातील माेठ्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी मधुशालाच भरत असल्याची माहिती आहे़. पाेलिसांनी अनेकवेळा कारवाईही केली, मात्र त्यामधून आणखी वाद वाढत असल्याने काेरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी गावाबाहेर दारू पिणाऱ्यांवर पाेलिसांनी नाईलाजाने दुर्लक्ष केल्याची माहिती आहे.
सायंकाळी ७ नंतर गर्दी
शहरातील खुले मैदान तर एमआयडीसीतील माेकळ्या रस्त्यांवर सायंकाळी ७ वाेजनंतर गर्दी हाेत असून, ही गर्दी रात्री १० वाजेपर्यंत राहत असल्याची माहिती आहे. त्यानंतर मात्र पाेलिसांची गस्त वाढत असल्याने मद्यपी अशा ठिकाणांवरून काढता पाय घेत आहेत.
हायवेवरील ढाब्यांवर अवैध दारू
राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यांना खुली सूट देण्यात आली आहे. त्यामुळे पाेलिसांच्याच आशीर्वादाने राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ढाब्यांवर दारूची अवैधरीत्या विक्री सुरू असते. याकडे पाेलिसांचेही दुर्लक्ष असल्याने ढाबेच बार बनले आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्यांवर पाेलिसांचा मात्र वचक नसल्याचेही वास्तव आहे. पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने या ढाब्यांवर कारवाई करीत तब्बल ३०० जनांना पकडले हाेते हे विशेष.
शेजाऱ्यांना त्रास, तक्रार करून फायदा नाही
शहरातील अनेक ठिकाणी देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री सुरू आहे, तर काही ठिकाणी बियर शाॅपीही उघडून ठेवलेल्या हाेत्या. या ठिकाणी येणाऱ्या मद्यपींचा शेजाऱ्यांना प्रचंड त्रास आहे. त्यांनी तक्रारीही केल्या आहेत, मात्र यावर काहीही हाेत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.