सर्वोपचार रुग्णालयात 'बारकोड' प्रवेशिकेवरच होईल रुग्णांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:44 PM2019-01-28T12:44:37+5:302019-01-28T12:45:29+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात होणारी गर्दी, अस्वच्छता आणि उत्तम रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून प्रथमच बारकोड प्रवेशिकेला सुरुवात करण्यात आली आहे.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात होणारी गर्दी, अस्वच्छता आणि उत्तम रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून प्रथमच बारकोड प्रवेशिकेला सुरुवात करण्यात आली आहे. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनानिमित्त पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते या प्रणालीला सुरुवात करण्यात आली. रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बारकोड प्रवेशिकेचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.
सर्वोपचारमध्ये ‘पास’प्रणाली सपशेल अपयशी ठरल्यानंतर प्रभावी ‘बारकोड पास’प्रणाली राबविण्यास सुरुवात करण्यात येत आहे. या माध्यमातून एका रुग्णामागे केवळ दोनच नातेवाइकांना रुग्णाला भेटण्याची मुभा दिली जाईल. सर्वोपचारमधील गर्दीवर नियंत्रणासाठी हा प्रयोग प्रभावी ठरणार. सर्वोपचारमध्ये प्रथमच ‘बारकोड पास’प्रणालीचा प्रयोग राबविण्यात येत असून, यशस्वी झाल्यास एक रोल मॉडेल म्हणून अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयाकडे बघण्यात येणार आहे. रुग्ण दाखल होताच त्याच्या केस पेपरसोबत रुग्णांच्या नातेवाइकांना बारकोड पास दिली जाईल. एका रुग्णासोबत केवळ दोनच पास दिल्या जाणार असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची अतिरिक्त गर्दी टाळण्यास मदत होईल. रुग्णालयात नातेवाइकांना प्रवेशिका देण्यात याव्यात, याबाबत मार्ड संघटनेद्वारा राज्य स्तरावर संप करण्यात आला होता. सर्वोपचार रुग्णालयात यापूर्वी लाल व पिवळ्या रंगाचे पास सुरू करण्यात आले होते; परंतु ही प्रणाली अपयशी ठरल्याने अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी कांजी मधार आणि रवी शेगोकार यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे अधिष्ठाता डॉ. कार्यकर्ते यांनी सांगितले.
‘बारकोड’ प्रवेशिका प्रणालीचे उपयोग
- रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे असामाजिक तत्त्वांपासून संरक्षण होईल.
- विविध वॉर्डातील अनावश्यक गर्दी कमी होण्यास मदत होईल.
- विविध वॉर्ड्स व रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मदत होईल.
- अनधिकृत व्यक्तींच्या, रुग्णालय व रुग्णालय परिसरातील प्रवेशावर निर्बंध घालता येतील.
- दानशूर व्यक्तींना, रुग्णांच्या गरजू नातेवाइकांना अन्नदान करताना या प्रणालीचा उपयोग होईल.
सर्वोपचारमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी पहिल्यांदाच ‘बारकोड पास’प्रणाली राबविण्यात सुरुवात झाली आहे. या प्रकारची प्रणाली कदाचितच इतर रुग्णालयांमध्ये राबविण्यात आली असावी, हा प्रयत्न यशस्वी झाल्यास अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एक आदर्श म्हणून सर्वांसमोर असेल.
- डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.